आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाला लुटले

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 19, 2026
Spread the love

पुणे : वाहतूक पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाकडील सोन्याची अंगठी आणि सोनसाखळी असे ५ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने काढून घेऊन चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत एका ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पौड रोडवरील पेट्रा बिल्डिंग, एचडीएफसी बँकेसमोरील रस्त्यावर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोथरूडमधील भुसारी कॉलनीत राहायला आहेत. ते बुधवारी दुपारी पौड फाटा चौकातून निघाले होते. काही अंतरावर दोघा चोरट्यांनी त्यांना अडविले. साध्या वेशातील या चोरट्यांनी आपण वाहतूक पोलीस असल्याची बतावणी केली. सिग्नल तोडल्याचे सांगून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी फिर्यादीला सांगितले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीला हातातील सोन्याची अंगठी आणि गळ्यातील सोनसाखळी असे ५ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने काढून देण्यास भाग पाडले. हे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली. रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुप्रिया जगताप तपास करत आहेत.