अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई
औंध परिसरात माजवली होती दहशत : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : औंध परिसरात दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली असून, त्याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
मोहन अरुण अडागळे (वय २१, रा. विधाते वस्ती, दत्तनगर, जयगणेश कॉलनी, औंध) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. मोहन अडागळे याने साथीदारांसह चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या परिसरात खुनाचा प्रयत्न, दरोडा, घातक हत्यारे बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील चार वर्षांत त्याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे चतु:शृंगी पोलिसांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठवला होता.
या प्रस्तावाची पडताळणी करून मोहन अरुण अडागळे याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त ब्रह्मदेव गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक शीतल जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक उमेश कोळी, महिला पोलीस हवालदार जाधव, अजित गायकवाड, बाबू शिर्के, दहातोंडे, तांदळे, पोलीस अंमलदार संदीप ठोसर, सूर्यकांत मानकुबरे, वाघेश कांबळे आणि योगेश बडगे यांनी केली आहे.
