चौघांना पकडून ४ पिस्टल, १५ जिवंत काडतुसे जप्त
वाघोली पोलिसांची कामगिरी : गोव्यावरून पिस्टल खरेदीसाठी आलेल्या दोघा तरुणांनाही अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : इंस्टाग्रामवरून ठरलेल्या व्यवहारानुसार पिस्टल खरेदी करण्यासाठी आलेल्या गोव्यातील दोघा तरुणांसह चौघांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ पिस्टल आणि १५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
आकाश उर्फ गज्या अशोक मोरे (वय २१, रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी), मनीष दिलीप फर्नांडिस (वय २६, रा. चांदोर, मडगाव, गोवा), चंद्रेश्वर माल्लेशी (वय २१, रा. चांदोर, मडगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
वाघोली पोलीस ठाण्यातील पोलीस पथक केसनंद भागात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्रदीप मोटे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जोगेश्वरी डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन ते चार जण थांबले असून, त्यांच्याकडे पिस्टल आहेत.
ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघू आणि पोलीस अंमलदारांनी तेथे जाऊन चौघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीची ४ पिस्टल, ४ मॅगझीन आणि १५ जिवंत काडतुसे आढळली. त्यांच्याकडून ४ लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघू, पोलीस अंमलदार प्रदीप मोटे, अशोक शेळके, महादेव कुंभार, मारुती वाघमारे, विशाल गायकवाड आणि मंगेश शेळके यांनी केली.
मध्य प्रदेशातून आणली होती पिस्तुले – आकाश मोरे याच्यावर यापूर्वी पिस्टल बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याने इंस्टाग्रामवर पिस्टल विक्रीची पोस्ट टाकली होती. ती पाहून मनीष याने त्याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्यात व्यवहार ठरला. त्यानुसार पिस्टल खरेदी करण्यासाठी ते केसनंद येथे आले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. आकाश याने ही पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली होती. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
