मोक्का गुन्ह्यात ७ महिने फरार सराईत गुंड जेरबंद
गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाची कामगिरी : डेक्कन परिसरात कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वारजे परिसरात तरुणावर वार करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यावर मोक्का कारवाई करण्यात आल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून फरार असलेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने जेरबंद केले आहे.
मनीष शांताराम गंगावणे (वय ३०, रा. वारजे माळवाडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. वारजे पोलीस ठाण्यात मनीष गंगावणे याच्याविरुद्ध मारहाण करून जखमी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का कारवाई केली होती. गेल्या सात महिन्यांपासून तो फरार होता.
गुन्हे शाखेचे युनिट ३ चे पथक सिंहगड रोड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार किशोर शिंदे, कैलास लिमण आणि योगेश झेंडे यांना माहिती मिळाली की, मनीष गंगावणे हा डेक्कन येथील चौपाटीवर आला आहे. या माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने त्याचा शोध सुरू केला.
त्यावेळी तो शेलारमामा चौकाजवळील बीड अंडा राईस हॉटेलच्या मागे बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कोथरूडच्या सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस हवालदार किशोर शिंदे, कैलास लिमण, योगेश झेंडे, अतुल साठे, विपुल गायकवाड, पुरुषोत्तम गुल्ला, तुषार किंद्रे आणि आशिष राठोड यांनी केली आहे.
