आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कात्रज गावात गॅस सिलेंडरमुळे भीषण आग

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 24, 2026
Spread the love

पुणे : कात्रज गावातील नवीन वसाहत परिसरात सोमवारी (२३ नोव्हेंबर) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास एका घरातील घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरला आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रात्री ८ वाजून २२ मिनिटांनी अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळाकडे रवाना झाले.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर तळमजला, पहिला मजला आणि पत्र्याचे शेड असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर आग लागल्याचे जवानांच्या निदर्शनास आले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आठ होजच्या लाईन तयार करून पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर आग पूर्णपणे विझवण्यात आली.

प्रभारी अधिकारी वसंत भिलारे आणि सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास शिंदे, पंकज इंगवले, विनायक घागरे, प्रतीक शिर्के, अभिषेक खाटपे आणि लियाकत मुजावर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

आग पूर्णपणे विझल्याची आणि परिसरात कोणताही धोका नसल्याची खात्री करून जवानांनी उपस्थित नागरिकांना आवश्यक त्या सुरक्षेच्या सूचना दिल्या. त्यानंतर रात्री १० वाजून २७ मिनिटांनी अग्निशमन दलाचे वाहन केंद्रात परतले.