आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सावधान, कारमध्ये रोकड, लॅपटॉप ठेवताय?

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 27, 2026
Spread the love

पुणे : कार पार्क करताना आपण थोडा वेळच बाहेर जाणार आहोत, कारमधून कोण चोरी करणार आहे, असा विचार करून अनेकजण कारमध्ये रोकड, लॅपटॉप तसेच इतर मौल्यवान वस्तू ठेवतात. मात्र, काही वेळा हा निष्काळजीपणा नुकसानीचा ठरू शकतो. कारची काच फोडून हॉटेल व्यावसायिकाकडील पाच लाख रुपयांची रोकड अवघ्या अर्ध्या तासात लंपास केल्याची घटना कोंढव्यातील येवलेवाडी भागात घडली.

याबाबत एका हॉटेल व्यावसायिकाने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सासवड येथे राहायला आहेत.

त्यांचे सासवड परिसरात हॉटेल आहे. गुरुवारी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ते येवलेवाडी परिसरात हॉटेल व्यवसायासाठी लागणारे साहित्य तसेच चहा पावडर खरेदी करण्यासाठी आले होते.

त्यांनी सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील एका वितरकाच्या गोदामाजवळ कार पार्क केली. कारमध्ये ठेवलेल्या पिशवीत पाच लाख रुपयांची रोकड होती.

दुपारी एकच्या सुमारास ते वितरकाकडून चहा पावडर खरेदी करून परत आले. त्यावेळी मोटारीची काच फोडून पिशवीत ठेवलेली पाच लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.