कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ६८ अवैध शस्त्रे जप्त
७१ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन : ४२ ठिकाणी नाकाबंदी, जामीन मिळालेल्या ५२९ जणांची तपासणी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शिवाजीनगर न्यायालयासमोर भरदिवसा एका तरुणावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी शहरातील सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागांत विशेष मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) राबवून गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. नाकाबंदी करून संशयित दुचाकीस्वार आणि मोटारचालकांची तपासणी केली. या कारवाईत अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ६५ गुन्हे दाखल करून ३१ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ६८ अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली.
शिवाजीनगर न्यायालयासमोर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत खून, खुनाचा प्रयत्न तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई झाल्यानंतर जामीन मिळवून बाहेर आलेल्या सराईतांची तपासणी केली. मकोका कायद्यांतर्गत कारवाईत जामीन मिळवलेल्या १८१ सराईतांची तपासणी करण्यात आली. तसेच, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या १५१ गुन्हेगारांची तपासणी केली. वेगवेगळ्या गुन्ह्यांत जामीन मिळवून बाहेर आलेल्या ५२९ जणांची तपासणी करण्यात आली. ते वास्तव्यास असलेल्या भागात जाऊन पोलिसांनी त्यांची चौकशी केली.
पोलिसांनी शहरातील ७१ ठिकाणी विशेष मोहीम राबविली. ४२ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. शहरातील संवेदनशील भागांतील ९० ठिकाणी पायी गस्त घालण्यात आली.
अमली पदार्थ विक्रीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विक्रीप्रकरणातील १७८ पैकी ७३ जण मिळून आले. पॉक्सो गुन्ह्यांतील ११६ आरोपींपैकी ५० जण मिळून आले. जबरी चोरीच्या १२३ आरोपींपैकी ४४ आरोपींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. शहरातून तडीपार केल्यानंतर पुन्हा शहरात आलेल्या ७ सराईतांना पोलिसांनी अटक केली. शहर पोलिसांनी या धडक मोहिमेद्वारे शहरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
