सेल्स मॅनेजरनेच घातला गंडा
स्वारगेट येथील शोरूममधील घटना : बनावट पावत्या, आरटीओ पासिंग लेटर आणि इन्शुरन्स तयार करून ४४ लाखांची फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : तीनचाकी रिक्षांच्या शोरूममध्ये काम करणाऱ्या सेल्स मॅनेजरने बनावट पावत्या, आरटीओ पासिंग लेटर व इन्शुरन्सची कागदपत्रे तयार करून ४४ लाख १३ हजार ७४० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत पराग दिलीपराव पांडे (वय ४०, रा. पाषाण) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दीपक मोहन शिंगाडे (रा. लक्ष्मी लेक निवास, दत्तनगर, जांभुळवाडी, आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना स्वारगेट येथील लक्ष्मी नारायण चौकातील सुफलाम मोटार कंपनीत डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुफलाम मोटार कंपनीकडे पियाजिओ या तीनचाकी वाहनांची डीलरशिप आहे. त्यांच्या स्वारगेट येथील शोरूममध्ये दीपक शिंगाडे सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांनी फिर्यादींचा विश्वास संपादन करून शोरूममध्ये येणाऱ्या ग्राहकांना बनावट पावत्या, आरटीओ पासिंग लेटर व इन्शुरन्सची बनावट कागदपत्रे तयार करून दिली. त्यांच्याकडून रोख रक्कम व बँक खात्यावर पैसे घेतले. अशा प्रकारे एकूण ५६ लाख ८८ हजार ७४० रुपयांची फसवणूक केली.
कंपनीने केलेल्या लेखापरीक्षणात ही बाब समोर आली. त्यानंतर त्यांनी या प्रकाराची कबुली देऊन १२ लाख ७५ हजार रुपये कंपनीला परत केले. परंतु, उर्वरित ४४ लाख १३ हजार ७४० रुपये कंपनीच्या खात्यावर जमा न करता शोरूममध्ये येणाऱ्या ग्राहकांची तसेच कंपनीची फसवणूक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र जगदाळे तपास करीत आहेत.
