आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मंदार किवळे हल्ला प्रकरणी आणखी तिघे जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 28, 2026
Spread the love

पुणे : शिवाजीनगर न्यायालयासमोर मंदार किवळे याच्यावर कोयत्याने वार करून पसार झालेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने इंदापूर तालुक्यातील पळसदेव परिसरातून अटक केली. तिघे आरोपी मांजरी येथून खासगी बसमध्ये बसून कर्नाटकात पळून जात होते.

कुमार शिवाजी गाडे (वय २५), हर्षद रमाकांत साबळे (वय २४), रोहित काशीनाथ धोंगडे (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शिवाजीनगर न्यायालयासमोर मंदार किवळे याच्यावर वैमनस्यातून पिस्तुलातून गोळीबार करून कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. किवळे हा न्यायालयीन कामकाजासाठी आला होता. न्यायालयासमोरील रस्त्यावर त्याचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता.

या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्यानंतर शुक्रवारी २७ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत पुण्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे आदेश दिले.

यापूर्वी अक्षय चव्हाण (वय २०), अमोल चव्हाण (वय ४८), ओंकार ऊर्फ बाब्या पवार (वय १९), सत्यम मोरे (वय २५), सूरज मळेकर (वय २२), स्वप्नील गवळी (वय २८) आणि प्रथमेश ऊर्फ येनप्पा येनपूरे यांना अटक करण्यात आली होती. आतापर्यंत शिवाजीनगर न्यायालयासमोरील हल्ला प्रकरणात ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मंदार किवळे आणि त्याच्या साथीदारांनी अक्षय चव्हाण याचा भाऊ शुभम याचा गेल्या वर्षी खून केला होता. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर तो १८ नोव्हेंबर रोजी तुरुंगातून बाहेर आला होता. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अक्षयने साथीदारांच्या मदतीने हल्ल्याचा कट रचला होता. अक्षय याने मध्य प्रदेशातील उमराटी येथून पप्पीभाई याच्याकडून दोन पिस्तुले खरेदी केली होती. ही पिस्तुले खरेदी करण्यासाठी त्याने प्रथमेश येनपूरे याला मध्य प्रदेशातील उमराटी येथे पाठविले होते. तेथून त्यांनी दोन पिस्तुले आणली होती. गोळीबार करून कोयत्याने वार करण्याचा कट त्यांनी आखला होता. त्याप्रमाणे त्यांनी मंदार किवळे याच्यावर हल्ला करून बदला घेण्याचा प्रयत्न केला. मंदार किवळे याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केल्याने त्याचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.

किवळे याच्यावर हल्ला करून आरोपी गाडे, साबळे आणि धोंगडे पसार झाले होते. तिघे जण खासगी प्रवासी बसमधून निघाले होते. त्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील पळसदेव परिसरात सापळा रचून तिघांना पोलिसांनी पकडले. तिघे जण हडपसर भागातून खासगी प्रवासी बसने कर्नाटकातील हुमनाबाद येथे निघाले होते. पळून जाण्याच्या तयारीत असताना तिघांना पाठलाग करून पकडण्यात आले. – गौहर हसन, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा