आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पतीने पत्नीवर केले चाकूने वार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 27, 2026
Spread the love

पुणे : दारूच्या आहारी गेलेल्या पतीचे व्यसन सुटावे, म्हणून पत्नीने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. मात्र, व्यसनमुक्ती केंद्रात ठेवल्याच्या रागातून पतीने पत्नीवर चाकूने वार करून तिला जखमी केल्याची घटना वाघोलीत घडली.

याबाबत पत्नी सोनाली (वय ३३) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पती राजेश पोपट वडघुले (वय ३८, रा. वास्तू गोल्ड सोसायटी, बायफ रोड, वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश हा कोणताही कामधंदा करत नाही. वडघुले यांची टाकळी येथे शेती आहे. राजेश याला दारूचे व्यसन आहे.

दारूचे व्यसन सोडविण्यासाठी पत्नीने नातेवाईकांच्या मदतीने पतीला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. तेथून तो परत आला होता.

आपल्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठविल्याचा राग त्याच्या मनात होता. याच कारणावरून २५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास राजेश याने सोनाली यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

त्याने त्यांना शिवीगाळ करून ‘तुला संपवून टाकतो,’ अशी धमकी दिली. त्यानंतर खिशात ठेवलेल्या दोन चाकूंनी दोन्ही हातांनी सोनाली यांच्या उजव्या हाताच्या बोटांवर आणि डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ वार करून त्यांना जखमी केले. पोलीस हवालदार ठोंबरे तपास करत आहेत.