अध्यक्षपदी सुरेश वाबळे तर उपाध्यक्षपदी प्रा. व्ही. एस. अंकलकोटे पाटील यांची बिनविरोध निवड
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकाच्या पुणे येथे झालेल्या सभेत सन २०२१ ते २०२६ या कालावधी करिता अध्यक्षपदी सुरेश वाबळे यांची तसेच उपाध्यक्षपदी प्रा. व्ही. एस. अंकलकोटे पाटील यांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी मिलिंद सोबले यांनी घोषित केले.
फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट ही देशातील कार्यरत असणाऱ्या सर्व मल्टिस्टेट पतसंस्थांच्या विकासात्मक धोरणावर काम करणारी एकमेव संघटना असुन या फेडरेशन मार्फत मल्टिस्टेट पतसंस्थांना येणाऱ्या अडचणी व त्यावर मार्ग काढण्यासाठी देशभरात प्रशिक्षण, मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन तसेच सहकार चळवळ भक्कम करण्याचे काम केले जाते. फेडरेशन ऑफ मल्टिस्टेटमध्ये सध्या महाराष्ट्र व कर्नाटक मधील मल्टिस्टेट पतसंस्थेंचा समावेश असून लवकरच आणखी सात राज्यांतील मल्टिस्टेट पतसंस्थेंचा समावेश होणार आहे.
आज झालेल्या सभेस जितेंद्र जैन, मगराज राठी, कडूभाऊ काळे, मारोतीराव कंठेवाड, जयसिंह पंडित, नारायण खांडेकर, रवींद्र कानडे, अशोक ओव्हळ, सुकुमार पाटील, रोहन देशमुख, दिलीपसिंह भोसले, राहुल महाडिक व धनलक्ष्मी हजारे हे सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. मल्टिस्टेट फेडरेशनचे कायदेशीर सल्लागार प्रमोद गडगे, राज्य पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखाताई लवांडे, शिवाजी अप्पा कपाळे यांचे हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष्यांचा सत्कार करण्यात आला तर रवींद्र कानडे यांनी सर्वांचे आभार मानले.
