विश्रामबाग पोलिसांत गुन्हा : शास्त्री रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे खळबळ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : फर्ग्युसन महाविद्यालय परिसरातील हेअर स्पामध्ये तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी पुण्यातील सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थीनीचा भररस्त्यात विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.10) सकाळी अकराच्या सुमारास शास्त्री रोड परिसरात घडली.
नवी पेठत राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी तरुणी ही सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मैत्रिणीसोबत शास्त्री रस्त्यावरुन टिळक रोडने जात होती. त्यावेळी चिंतामणी इमारतीसमोर अचानक एका तरुणाने अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्याकडे पाहून अश्लिल बोलण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या तरुणीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत अनोळखी तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. शहरात सलग दुसऱ्या दिवशी तरुणीचा भररस्त्यात विनयभंग केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यात महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडत असल्याने तरुणींकडून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अशा विकृत व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
