विनयभंग करणाऱ्या पोर्टर डिलिव्हरी बॉयला शिवाजीनगर पोलिसांनी केले गजाआड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ऑनलाईन वस्तू मागवताना डिलिव्हरी देण्यासाठी येणारी व्यक्ती कोण असेल आणि तिची वृत्ती कशी असेल, याची माहिती ग्राहकांना नसते. अनेक तरुण डिलिव्हरी बॉय म्हणून प्रामाणिकपणे काम करत असले तरी काहीजण चुकीच्या हेतूने महिलांशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न करतात. शिवाजीनगर गावठाण परिसरात शुक्रवारी अशीच एक घटना घडली.
पाणी मागण्याचा बहाणा करून एका डिलिव्हरी बॉयने तरुणीचा हात पकडत, ‘‘तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात’’ असे म्हणत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. श्रीधर हरीभाऊ कांबळे (वय २७, रा. शुक्रवार पेठ, मूळ रा. कराड) असे अटक करण्यात आलेल्या पोर्टर कंपनीच्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे.
याबाबत ३० वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी, ६ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर गावठाण परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीधर कांबळे हा पोर्टर कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो शिवाजीनगर गावठाण परिसरात डिलिव्हरी देण्यासाठी आला होता. फिर्यादी तरुणीला डिलिव्हरी दिल्यानंतर त्याने पिण्यासाठी पाणी मागितले.
तरुणी पाणी देत असताना त्याने तिचा उजवा हात पकडत, ‘‘तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात’’ असे म्हणत तिच्या मनास लज्जा वाटेल असे वर्तन केले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला.
घटनेनंतर तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळवून तांत्रिक तपासाच्या मदतीने त्याचा शोध घेतला आणि श्रीधर कांबळे याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील करीत आहेत.















