बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद : गाड्यांच्या काचा फोडून केले मोठे नुकसान
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : हातामध्ये लोखंडी कोयता व लाकडी बांबू घेऊन आम्ही इथले भाई आहोत, आमचा एरिया आहे, कोणी मध्ये पडले तर जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देत दहशत माजविणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. बिबवेवाडीतले अप्पर डेपोकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला सरगम चाळ येथे २३ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही घटना घडली.
काशीनाथ निंगदळे (वय ४२, रा. अपर बिबवेवाडी, पुणे) यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार सात-आठजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले कि, आरोपीने साथीदाराच्या मदतीने हातामध्ये लोखंडी कोयता व हातात लाकडी बांबू घेऊन फिर्यादी राहत असलेल्या चैत्रबन वसाहत, अप्पर डेपोकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला उभ्या असलेल्या पॅगो टेम्पोची काच फोडली, त्याच वस्तीतील परमेश्वर दसाडे यांच्या टेम्पो व किरण सोनकांबळे यांच्या टेम्पोच्या काचेवर कोयत्याने मारून पॅगो व टेम्पोचे नुकसान केले. लोखंडी कोयता व लाकडी बांबूचा धाक दाखवत आम्ही इथले भाई, हा आमचा एरिया आहे, मध्ये कोणी पडले तर जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देत परिसरात दहशत माजविली.
त्यानंतर पवननगर येथील शनि मंदिराजवळ उभ्या असलेल्या दीपक पवार व आनंद शिंगे यांच्या रिक्षाच्या काचेवर व संदेश पटेल यांच्या दुचाकीचे मागील लाईट, ओमकार भोसले याच्या कारचे काचेवर कोयत्याने वार करून २९ हजार रुपयांचे नुकसान केले. बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळोखे पुढील तपास करीत आहेत.















