वारजे पोलिसांत फिर्याद : सुविधांशिवाय सहा वर्षे दिला उशिराने फ्लॅट
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सतीश बोरा अँड असोसिएट्स यांच्या वारजे येथील लिबेरो गृह प्रकल्पात खरेदी केलेल्या फ्लॅटचा ताबा वेळेवर न देता विलंबाने दिला. तसेच ब्रोशरमध्ये दिलेल्या कोणत्याही सुविधा न देता फ्लॅटधारकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी सतीश बोरा अँड असोसिएट्सच्या तीन संचालकांवर वारजे पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट (मोफा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मे. सतीश बोरा अँड असोसीएट्सचे सतीश कांतीलाल बोरा, सुजाता सतीश बोरा, पंकज सतीश बोरा (सर्व रा. रचना अव्हेन्यु, एफसी रोड, सागर आर्केड, डेक्कन जिमखाना) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रल्हाद दामोदर सातव (वय ७०) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, प्रल्हाद सातव यांनी सतीश बोरा अँड असोसीएट्सच्या वारजे येथील लिबेरो गृह प्रकल्पात 6 ऑक्टोबर 2014 रोजी फ्लॅट बुक केला होता. सातव यांनी खरेदीखत करुन देताना 20 टक्के आगाऊ रक्कम भरलेली होती. त्यांना फ्लॅटचा ताबा 31 डिसेंबर 2015 रोजी देण्याचे लिहून देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना 17 डिसेंबर 2021 रोजी फ्लॅटचा ताबा दिला. फ्लॅटचा ताबा देण्यास आरोपींनी सहा वर्षे उशीर केला.
फ्लॅट सहा वर्षे उशिराने देऊन देखील आरोपींनी ब्रोशरमध्ये दिलेल्या कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. तसेच फ्लॅट धारकांकडून आगाऊ घेतलेले पैसे बँकेत न ठेवता त्याचा हिशोब ठेवला नाही. सदनिका घेतल्यानंतर चार महिन्याच्या आत कंडोमिनियम नोंदणी करण्यासाठी संबंधीत कार्यालयात अर्ज करावा लागतो. मात्र आरोपींनी तसे केले नाही. याशिवाय दस्तावर अधिकाऱ्याची सही न घेता, चुकीचा बनावट दस्त तयार करुन फिर्यादी यांची फसवणूक केली. फिर्यादी यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केल्यानंतर पोलिसांनी अर्जाची चौकशी करुन सतिश बोरा अँड असोसिएट्सच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
