पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : नांदेड फाटा येथील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क
पुणे : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरात २३ मार्च रोजी दिवसाढवळ्या युवकाचा खून करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली.
अमोल अर्जुन शेलार (वय 19, रा. पोकळे वस्ती, धायरेश्वर मंदिराजवळ, धायरी) व अभिजित राम गंगणे (वय 20, रा. जनता वसाहत, गल्ली नं. 42, पर्वती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, बुधवार (23 मार्च) रोजी सांयकाळच्या दरम्यान मारुती लक्ष्मण ढेबे (वय 20) यांच्यावर एका कारमधून आलेल्या 6 ते 7 जणांनी कोयत्याने हल्ला केला होता. त्यात ढेबे याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोरांनी पळ काढला. ही सर्व घटना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. यामुळे पोलिसांना आरोपींची नावे निष्पन्न करण्यात यश आले होते. दरम्यान, खुन झालेला मारुती ढेबे हाही सराईत गुन्हेगार होता. गतवर्षी नांदेड गावातील एका तरुणावर त्याने व त्याच्या काही साथीदारांनी तलवार व कोयत्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यातून तो तरुण थोडक्यात बचावला होता. मृत ढेबे याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दहशत पसरवणे, मारहाण करणे असे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत.
ढेबे खून प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी हवेली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीसांची पथके आरोपींचा शोध घेत होती. या प्रकरणातील 2 आरोपींना अटक केली. रांजणगाव गणपती येथील पुणे-नगर रस्त्याला लागून असलेल्या एका लॉजमध्ये हे आरोपी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक अमोल शेडगे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी 2 आरोपींना झोपेत असताना शनिवार दिनांक 26 रोजी पहाटेच्या सुमारास अटक केली. यानंतर त्यांना पुढील तपासासाठी हवेली पोलीस ठाण्याकडे सुपुर्द केले. याप्रकरणी अधिक तपास एपीआय निरंजन रणवरे करीत आहेत.
