येरवडा पोलिसांत फिर्याद : २८ एप्रिल रोजी कुलूप तोडून केला घरात प्रवेश
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वृद्धापकाळात आधार देण्याऐवजी घराबाहेर काढून बेघर करणाऱ्या दोन विवाहित मुलींवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलींनी 28 एप्रिल रोजी फिर्यादी व फिर्यादीचे भाडेकरु यांचे घराचे कुलूप दगडाने तोडून रूम मध्ये प्रवेश केला.
याप्रकरणी येरवड्यातील अशोकनगरमध्ये राहणार्या 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी येरवडा व फलटण सातारा रोडवर राहणार्या दोन विवाहित मुलींवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या ज्येष्ठ नागरिक असून, त्यांची पालन पोषणची जबाबदारी त्यांच्या मुलीवर आहे. आरोपी मुलींनी त्यांना कोणत्याही प्रकारे अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सोयीसुविधा दिल्या नाही. त्यांच्या पालन पोषणासाठी काही केले नाही. आरोपी मुलींनी 28 एप्रिल रोजी फिर्यादी व फिर्यादीचे भाडेकरु यांचे घराचे कुलूप दगडाने तोडून रूम मध्ये प्रवेश केला. रुममधील सर्व कपडे, भांडी, कपाट व इतर सर्व वस्तू हे रुमच्या बाहेर फेकून तोडून नुकसान केले. त्यांच्याकडील कुलूप हे दोन्ही रुमला लावून रुमचा ताबा घेतला, म्हणून गुन्हा नोंद केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक खटके तपास करीत आहेत.