४३ लाखांच्या वसुलीसाठी व्यावसायिकाला दिली होती धमकी : खंडणीचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : व्यवसायाचे हिशोब पाहणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटकडून हातउसने घेतलेले पैसे परत केल्यानंतरही त्याने ४३ लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर या चार्टर्ड अकाउंटंटने वसुलीसाठी टिपू पठाणच्या साथीदाराला सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलिसांनी चार्टर्ड अकाउंटंटसह टिपू पठाणच्या साथीदाराला अटक केली आहे.
अनिल संभाजी यादव (वय ४२, रा. कर्वेनगर) आणि नदीम खान (वय ४२, रा. सय्यदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत हंपलिंग बसवेश्वर भद्रे (वय ५०, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार २०२३ पासून आतापर्यंत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा अॅम्ब्युलन्स भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायाचे वार्षिक जमा-खर्चाचे हिशोब पाहण्यासाठी त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट अनिल यादव यांची नेमणूक केली होती. यादव यांना ते मागील २० ते २५ वर्षांपासून ओळखतात.
२०१८ मध्ये त्यांना पैशांची अडचण असल्याने त्यांनी अनिल यादव यांच्याकडून १२ लाख रुपये हातउसने घेतले होते. तेव्हा यादव यांनी घेतलेल्या पैशांच्या व्याजाबाबत काही बोलले नव्हते. २०१९ ते २०२२ दरम्यान त्यांनी एकूण २३ लाख ८८ हजार रुपये घेतले होते. ते वेळोवेळी पैसे परत करत गेले आणि त्यांनी एकूण २४ लाख रुपये परत केले.
२०२३ मध्ये त्यांनी अनिल यादव यांना पैसे देणे बंद केले. तेव्हा अनिल यादव यांनी “मी तुला दिलेले पैसे बँकेतून कर्ज काढून दिले होते. तू फक्त व्याजच देत होता. अजून ४३ लाख रुपये बाकी आहेत,” असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी “तू दिलेल्या पैशांपेक्षा अधिक पैसे परत केले आहेत. आता पैसे देणार नाही,” असे सांगितले.
जुलै २०२३ मध्ये त्यांना एका फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःचे नाव नदीम खान असल्याचे सांगितले. नदीम खान याने त्यांना सांगितले की, “अनिल यादव याने मला तुमच्याकडून पैसे वसूल करण्याची सुपारी दिली आहे. तुला पैसे द्यावेच लागतील.
पैसे कसे देत नाहीस ते पाहतो. तुझ्या गाड्या रस्त्यावर कशा चालतात ते बघतो,” अशी धमकी दिली. तसेच “मी टिपू पठाण गँगसाठी काम करतो. मी आठ दिवस बाहेर आणि बाकी दिवस जेलमध्ये असतो. तुला माझा इतिहास माहिती आहे का? बिनावत याच्यावर हडपसर येथे मी गोळीबार केला आहे,” असे सांगून त्यांना धमकावले.
त्यांनी टिपू पठाण याची माहिती घेतल्यानंतर त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी ऐकून ते घाबरले. त्यामुळे त्यांनी १ ऑगस्ट २०२३ पासून नदीम खान याला पैसे देण्यास सुरुवात केली. २३ मार्च २०२५ पर्यंत त्यांनी नदीम खान याला ३ लाख १५ हजार रुपये दिले आहेत.
एक महिन्यांपूर्वी नदीम खान याने त्यांना कॅम्पमधील हॉटेल डायमंड येथे बोलावून उर्वरित ४० लाख रुपये कधी देणार, असे विचारले. “जर पैसे दिले नाहीत तर तुला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी पुढील तपास करीत आहेत.



















