एक आरोपी जेरबंद : एकूण ७६,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर : सोलापूर ग्रामीण एल.सी.बी. पोलिसांना मौजे अकोलेकाटी येथील एका घरफोडीचोरीसह नळदुर्ग, तुळजापूर, बेंबळी पोलीस ठाणे हद्दीतील तीन चोऱ्यांची उकल करण्यात यश मिळाले असून, या प्रकरणी एका आरोपीस जेरबंद करण्यात येऊन एकूण ७६,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक २६ आणि २७ ऑगस्ट रोजी फिरोज सैफन पठाण (रा. अकोलेकाटी ता. उत्तर सोलापूर) यांच्या राहत्या घराचा कडीकोयंडा उचकटून घरफोडी करून दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १३ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला म्हणून यातील फिर्यादी फिरोज सैफन पठाण यांच्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर लागलीच फिर्यादीतील घरातील लोक जागे झाल्यानंतर घरात चोर शिरल्याची चाहूल लागल्यावर यातील फिर्यादी हा चोरांना पकडण्याचा प्रयत्न करीत असताना अज्ञात चोरटे हे घाईगडबडीत निघून जाताना चोरांच्या हातातील चाकू हा घटनास्थळी पडले होते. फिर्यादीस चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर तात्काळ त्यांने चोरी झालेल्या मोबाईलवर संपर्क केला असता, चोरट्याने मोबाईल वरील कॉल उचलून फिर्यादीस तुमच्या घरात माझा चाकू पडला आहे? असे सांगितले होते.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तेजस्वती सातपुते आणि अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सदर गुन्ह्यात लक्ष घालून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याकामी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना आदेशित केले होते. त्याप्रमाणे पाटील यांनी सदर घरफोडीचा आढावा घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी गुन्हे शाखेकडील सहपोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे आणि त्यांच्या पथकास सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मांजरे आणि त्यांच्या पथकाने गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषनावरून माहिती काढली असता, सदरचा गुन्हा हा उस्मानाबाद जिल्हयातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची माहिती मिळाली. त्यातील एक संशयित इसम हा वैराग येथील मौजे हातीद गावात त्याच्या नातेवाईकाकडे आला आहे. सदर इसमाबाबत अधिक माहिती घेतली असता तो मागील काही दिवसांपासून त्याच्या नातेवाईकाकडे राहण्यास आला असल्याची बातमी मिळाली.
सदर माहितीप्रमाणे मौजे हातीद (ता. बार्शी) येथील गावातून त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने मागील २ ते ३ दिवसांपूर्वी मौजे अकोलेकाटी (ता. उत्तर सोलापूर) येथे त्याच्या इतर तीन साथिदारांमार्फत दोन मोटार सायकलवर येऊन सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले. त्यास अधिक विश्वासात घेऊन त्याचेकडे तपास केला असता त्याने सांगितले की, मागील काही दिवसांपूर्वी त्याचे इतर साथीदारांसह तुळजापूर एस.टी स्टॅन्ड व तुळजापूर तालुका परिसरातून तसेच महाराष्ट्रातून इतर जिल्ह्यांतून देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर शहरात येणाऱ्या भाविकांच्या बॅगेमधून मंदिराच्या परिसरातून मोबाईल चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच मौजे इटकळ, मौजे लासोना, तुळजापूर येथे रात्रीच्या वेळी सोन्याचे दागिने, मोटारसायकल व मोबाईल चोरी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे सांगत असून त्यांने व त्याचे नातेवाईकांनी चोरलेले मोबाईल तो स्वतः व त्याचे नातेवाईक याने मौजे बसवंतवाडी (ता. तुळजापूर) येथील त्याच्या ओळखीच्या लोकांना आर्थिक अडचण सांगून विकले असल्याचे सांगितले.
सदर आरोपीकडून विविध कंपनीचे एकूण आठ मोबाईलसह ७६,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत माहिती घेतली असता नळदुर्ग, बेंबळी व तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, तसेच त्याचे इतर फरारी साथीदारांचा शोध घेऊन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरच्या आरोपीस सध्या सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून, न्यायालयाने त्यास तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार अक्षय दळवी, चालक समीर शेख आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे तपासी अंमलदार शिवाजी मोरे, देवीदास सोनलकर यांनी केली आहे.
