परदेशातील बँक खात्यातून पैसे स्वतःच्या खात्यात वळवले
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
एकाच कंपनीत कामाला असलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या लॉग इन आयडीचा वापर करून तरुणाने तीन कोटी ६८ लाख रुपयांचा अपहार केला. आरोपीने परदेशातील बँक खात्यातून पैसे स्वतःच्या खात्यात घेऊन त्यातून ६६ लाखांची बीएमड्ब्ल्यू घेतल्याचे उघडकीस आले. बीएमड्ब्ल्यू कारसह आरोपीने फ्लॅट, दुचाकी तसेच दागिन्यांची देखील खरेदी केली आहे.
आदित्य राजेश लोंढे (वय २९, रा. यशोदा हौसिंग सोसायटी, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) असे कंपनीत अपहार केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राहुल रतनलाल कौल (वय ४१) यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार्थिक गणपथी उर्फ कार्थिक सुब्रमनीयन व इतर बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, लोंढे यांच्याकडून ॲपल कंपनीचा मोबाईल व लॉपटॉप, स्कोडा कंपनीची कार यासह इतर ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोंढे याने तो काम करीत असलेल्या कंपनीतील एका सहकारी कर्मचार्यांच्या लॉग इन आयडीद्वारे २४ गैरव्यवहार करत कंपनीची तीन कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक केली. संबंधित रक्कम त्याने परदेशातील एका बँक खात्यात पाठवून स्वतःच्या खात्यात वळवून घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, लोंढे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले होते. कार्थिक याने लोंढेच्या बँख खात्यात २ कोटी ३७ लाख ८७ हजार रक्कम पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आदित्य याने अपहार केलेल्या ३ कोटी ६८ लाख रुपयांमधून कोंढवा येथून ६६ लाख ३ हजार ७७७ रुपयांची बीएमडब्ल्यू कार, ११ लाख ४७ हजार ६०० रुपये किंमतीची उंड्री येथे फिलीप्स व लिंडा फिलीप्स यांच्या नावे फ्लॅट याखेरीज सोन्याच्या दागिन्यांची तसेच दुचाकीची खरेदी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याच्या बँक खात्यावर विदेशातून पैसे जमा झाले असून गुन्ह्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्वरुपाची असल्याचे त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत सहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 
			


















