बार्शी तालुका पोलिसांची कामगिरी : आरोपी पांगरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी : खून प्रकरणातील पाच वर्षांनंतर फरार असलेल्या आरोपीस अटक करण्यात बार्शी तालुका पोलिसांना यश मिळाले असून सदर आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी पांगरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पांगरी पोलीस ठाण्यात २०१७च्या दाखल गुन्ह्यातील आरोपी वसंत बाबू मांजरे (रा. देवगाव (मां), ता. बार्शी जि. सोलापूर) यांने ०२ ऑक्टोबर २०१७ रोजी भालेराव वस्तीजवळ देवगाव येथे धर्मराज विठ्ठल मांजरे (रा. देवगाव (मां), ता. बार्शी, जि. सोलापूर) यांना टॉवेलमध्ये दगड बांधून डोक्यात मारून जखमी करून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. उपचारादरम्यान धर्मराज विठ्ठल मांजरे हे मयत झाले. त्यादिवसापासून वसंत बाबू मांजरे हा पुणे,आळंदी, जेजुरी, सातारा या ठिकाणी राहून वेश बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.
सहपोलीस निरीक्षक जायपत्रे यांना वसंत बाबु मांजरे हा आरोपी लोणंद (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे असल्याचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळल्याने उपविभागीय अधिकारी धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याकडील एक पथक आरोपीचा शोध घेणेकामी रवाना करून लोणंद गावच्या शेजारी पाडळी गावच्या शिवारात, महादेव नगर येथे पथकाने आरोपीस ताब्यात घेतले.
सदर गुन्ह्यातील पाच वर्षांपासून फरार असलेला आरोपी वसंत बाबु मांजरे (रा. देवगाव (मां), ता. बार्शी) यास पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, बार्शी तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहपोलीस निरीक्षक जायपत्रे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल माने, अभय उंदरे, पोलीस शिपाई धनराज फत्तेपुरे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई रतन जाधव यांनी महत्त्वाचे कार्य केले. सदर आरोपीस पुढील कारवाईकरिता पांगरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.















