खडकीतील महिलेने दिली फिर्याद : अश्लिल व्हिडिओ पाठविणारे तिघे आले चांगलेच ‘गोत्यात’
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अल्पवयीन १३ वर्षाच्या मुलीला फुस लावून गणपती दाखविण्याच्या बहाण्याने पळवून नेऊन तिच्याशी लगट करीत विनयभंग केला. तसेच, तिला अश्लिल व्हीडिओ पाठविणार्या व कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणार्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार २० मे ते १७ सप्टेंबर २०२१ दरम्यान हडपसर, तसेच खडकीबाजार येथे घडला आहे.
अविराज चंद्रकांत कांबळे (वय २१), शाहीद दादुसाहब शेख (वय २२), तन्वीर अहमद बंकापूर (वय २१, सर्व रा. महात्मा फुले वसाहत, गाडीतळ, हडपसर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी खडकी बाजार येथे राहणार्या एका महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी अविराज कांबळे याने फिर्यादी यांच्या १३ वर्षाच्या मुलीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. तिला मोबाईलवर मेसेज व फोन करुन वारंवार कुटुंबियांना जीवे मारण्याची तसेच स्वत:चा जीव देण्याची धमकी देऊन तिच्या मनात भीती निर्माण केली.
फिर्यादी यांच्या मुलीला वारंवार कधी हडपसर, तर कधी खडकी येथे भेटायला बोलावून तिच्याशी अश्लिल वर्तन केले. आरोपींनी संगनमताने गणपती दाखविण्याचा बहाणा करुन खडकी येथील राहते घरातून हडपसर येथे पळवून नेले. शाहीद शेख याने तेथे तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याचे व्हॉटसअॅपवरुन फिर्यादींच्या मुलीच्या मोबाईलवर अश्लिल व्हीडिओ पाठवून तिच्या मनात लज्जा निर्माण केली.
पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे तपास करीत आहेत.