गुन्हे शाखा पुणे शहर युनिट ६ची कामगिरी : क्षुल्लक कारणावरून दगडाने मारून केला खून
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : चारचाकीला दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दुचाकीस्वाराचा लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारून खून करणाऱ्या नराधमास बारा तासांच्या आत जेरबंद करण्यात गुन्हे शाखा पुणे शहर युनिट ६ला यश मिळाले असून आरोपीस लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात, गुन्हे शाखा युनिट ६ मार्फतीने समांतर तपास सुरू असताना गुन्ह्यातील मयत अक्षय अंकुश टिळेकर (वय २१) या दुचाकीस्वाराचा तीन अनोळखी इसमांनी लाथा-बुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून खून करून त्यांच्याकडील चारचाकी मोटारीमधून पळून गेले होते.
पोलीस शिपाई ताकवणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून सदरचा गुन्हा करणाऱ्या आरोपीपैकी एक आरोपी हा पुणे-नगर रोडवर शिक्रापूर येथील जुन्या पुलाजवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरबाबत गणेश माने, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहर यांना कळविली असता त्यांनी मिळालेल्या बातमीची खातरजमा करून कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेशित केल्याने दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक टेंगले, पोलीस नाईक रमेश मेमाणे, पोलीस शिपाई ऋषिकेश ताकवणे व पोलीस शिपाई सचिन पवार यांनी सापळा रचून शिताफीने आरोपी आकाश पूनम गवारे (वय २२, रा. विठ्ठलवाडी, भोसे वस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास करता त्याने बुधवारी १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्याचे स्विफ्ट कारमधून उरळी कांचन – भवरापूर रोडने जात असताना बगाडे वस्ती, उरळी कांचन येथे एका मोटारसायकलवरील इसमाचा त्यांच्या मोटारीला धक्का लागल्याच्या कारणावरून त्याच्यासोबत वाद झाला व त्यांनी दुचाकीस्वारास लाथा-बुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली, त्यामध्ये दुचाकीवरील इसम हा बेशुद्ध पडल्याने ते त्यांच्या चारचाकीमधून पळून गेल्याचे सांगितले. सदर आरोपीचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील तपासकामी त्यांना लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहपोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, प्रतीक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांचे पथकाने केली आहे.
