आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार

Spread the love

बार्शी : जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘सितारा महिला विकास संस्था’ यांच्या वतीने आयनॉक्स, कोरेगाव पार्क येथे आयोजित राज्यस्तरीय ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार सोहळ्यात माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पोलीस दलात ‘सिंघम’ म्हणून ओळख असलेल्या आंधळकर यांनी एलसीबी, पुणे ग्रामीण येथे कार्यरत असताना अनेक धाडसी कारवाया केल्या असून त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आपल्या पोलीस सेवाकाळात भाऊसाहेब आंधळकर यांनी अनेक धाडसी कारवाया केल्या. विशेषतः ३५४ पीडित मुलींना नरकयातनेतून मुक्त करून त्यांना सन्मानाने त्यांच्या घरी पोहोचवण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले.

तसेच गाजलेल्या रेव्ह पार्ट्यांवर टाकलेल्या धाडी आणि गुन्हेगारी विश्वात निर्माण केलेला त्यांचा दरारा यामुळे त्यांना पोलीस दलातील खऱ्या अर्थाने ‘सिंघम’ अशी ओळख मिळाली. पोलीस सेवेतून निवृत्तीनंतरही आंधळकर यांचे सामाजिक कार्य सुरूच आहे.

सध्या ते अन्नछत्र, महिला बचत गटांचे सक्षमीकरण आणि वैराग येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या कामात सक्रिय सहभाग घेत समाजसेवा करत आहेत. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना ‘सितारा आयकॉन’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

या सोहळ्यास सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई, ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना नेवरेकर, सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी उर्फ दादूस, उद्योजक नानजीभाई ठक्कर, समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे, पुणे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अभिनेत्री वैशाली जाधव तसेच राजयोगी दत्ताजी शिंदे महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना आंधळकर म्हणाले की, “हा सन्मान माझ्या खाकी वर्दीचा आणि समाजाप्रती असलेल्या माझ्या बांधिलकीचा आहे.”