महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) येथे मेट्रो मार्गिका तसेच दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहतुकीत करण्यात आलेले बदल रद्द करण्यात आले आहेत. परिणामी पाषाण, बाणेर आणि अभिमानश्री सोसायटी रस्त्यांवरील एकेरी वाहतुकीचे आदेश मागे घेऊन पुन्हा दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
मेट्रो मार्गिका आणि दुमजली उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे यापूर्वी विद्यापीठ चौक परिसरात वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले होते. त्यावेळी पाषाण रस्ता, बाणेर रस्ता आणि अभिमानश्री सोसायटी परिसरात दुहेरी वाहतूक बंद करून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती.
आता विद्यापीठ चौकातील काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली. त्यानुसार विद्यापीठ चौक–अभिमानश्री सोसायटी–बाणेर रस्ता या मार्गावर पुन्हा दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
तसेच पाषाणकडून अभिमानश्री सोसायटीमार्गे विद्यापीठ चौकाकडे जाणारी वाहतूकही दुहेरी करण्यात आली आहे. अभिमानश्री सोसायटीतून पाषाण आणि बाणेरकडे जाणारा रस्ताही आता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
बाणेर फाट्याकडून येणाऱ्या तसेच अभिमानश्री सोसायटीतून पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांनी सकाळनगर परिसरातून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

















