गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी : २६ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुणे : ज्वेलरी शॉपमध्ये ग्राहकांच्या नजरा चुकवून त्यांच्या बॅगमधून किमती वस्तू, सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट सहाला यश मिळाले असून एकूण २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फरासखाना पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट ६ करत असताना पोलीस नाईक रमेश मेमाणे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा बीड जिल्ह्यामधील आरोपींनी केला असून, ते पारनेर (जि. अहमदनगर) येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरबाबत पोलीस निरीक्षक गणेश माने यांना माहिती दिली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेऊन कार्यवाही करण्याबाबत आदेशित केल्याने सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी पथकासह पारनेर (जि. अहमदनगर) येथे जाऊन सापळा रचून शिताफीने आरोपी सुरेखा ज्ञानेश्वर पवार (वय २९, रा. मु. रामगव्हाण, पो. नालेवाडी, ता. अंबड, जि. जालना), नंदा किशोर पवार (वय २६, रा. मु. पो. वडीगोदरी, ता. अंबड, जि. जालना), ज्ञानेश्वर अंगद पवार (वय ३०, रा. मु. रामगव्हाण, पो. नालेवाडी, ता. अंबड, जि. जालना, आणि किशोर शिवदास पवार (वय २७, रा. मु. पो. वडीगोदरी, ता. अंबड, जि. जालना) यांना त्यांच्याकडील कारसह ताब्यात घेतले.
सदर आरोपींना तपास करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांना नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आले. त्यांना न्यायालयामध्ये हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करून त्यांच्याकडून अंदाजे २२,५०,००० रुपये किमतीचे व एकूण ४९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यामध्ये वापरलेली ३,५०,००० रुपये किमतीची टाटा झेस्ट मो/कार असा एकूण २६,००,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपींवर जालना, बीड, नाशिक, अहमदनगर, पुणे इत्यादी ठिकाणी अशाप्रकारचे बरेच गुन्हे दाखल असून, ज्वेलर्स शॉपमध्ये ग्राहकांच्या नजरा चुकवून त्यांच्या बॅगमधून किमती वस्तू, सोन्याचे दागिने चोरी करणे, अशी त्यांची गुन्हा करण्याची पद्धत आहे.
सदरची उल्लेखनीय कारवाई ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे- २) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखिले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, प्रतीक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर व ज्योती काळे यांनी केली आहे.
