बार्शीत युवासेनेचे आंदोलन : आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवारायांची मूर्ती बसविण्यात आली होती. या मूर्तीला विरोध करत काही समाजकंटकांनी मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याचवेळी दगडफेक करत दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्यात आली. तसेच काही महिलांवर हल्ला करून त्यांना लज्जास्पद वाटेल अशी मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत सहभागी असलेल्या गावातील सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी बार्शी युवासेनेच्या वतीने करण्यात आली.
या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी युवासेनेतर्फे बार्शी येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले व निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवासेना शहरप्रमुख (बार्शी) : हर्षवर्धन विजय पाटील यांनी शासनाने संबंधित आरोपींना तातडीने अटक करून मोक्का कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
युवतीसेनेच्या रजनी पाटील यांनी वारंवार होत असलेल्या स्त्रियांवरील हल्ले आणि अमानवी अत्याचारांविरोधात शासनाने कठोर पावले उचलावीत, असे सांगितले. नगरसेवक आकाश राऊत यांनी शिवरायांची शिकवण आत्मसात करून स्त्रियांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे व अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाप्रमुख महेश चव्हाण यांनी ही घटना अत्यंत निंदनीय असून पीडित कुटुंबांना तत्काळ पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख मंगलताई पाटील, शिवसेना शहरप्रमुख दिनेश नाळे, विधानसभा प्रमुख सचिन चव्हाण, राष्ट्रवादी लिगल सेलचे ॲड. हर्षवर्धन बोधले, युवासेना समन्वयक पांडुरंग घोलप, रणजीत घुमरे, अर्जुन सोनवणे, मयूर डोईफोडे, बापू कुलकर्णी, सागर पतंगे, सागर पवार यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने तात्काळ कारवाई न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींचा उद्रेक होऊ शकतो व त्यास शासन जबाबदार राहील, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.















