विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने निवड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गुजराती समाजाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जयंत शहा यांची समाजाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यालयात झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सर्व विश्वस्तांनी त्यांची अध्यक्षपदी निवड केली. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी अनुभवी नेतृत्वाची गरज लक्षात घेऊन ही जबाबदारी शहा यांच्यावर सोपविण्यात आली.
यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष नितीन देसाई यांचे ८ फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर अध्यक्षपद रिक्त झाले होते. देसाई यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम यशस्वीपणे राबविले होते.
अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहा म्हणाले की, “संस्थेच्या परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. समाजासाठी राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना अधिक बळ देण्यावर भर राहील.”
शहा हे जयराज ग्रुपचे संचालक असून ते ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज तसेच वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई (MVIRDC)च्या कौन्सिल ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य आहेत. त्यांनी गुजरातमध्ये त्यांच्या वडिलांच्या जन्मगावी आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दहा वर्षांपूर्वी चॅरिटेबल आयुर्वेदिक कॅन्सर हॉस्पिटल उभारले आहे.
तसेच जयराज डेव्हलपर्सच्या माध्यमातून ते गेल्या २५ ते ३० वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यात अनेक जैन मंदिरांच्या उभारणीतही त्यांचा सहभाग आहे. सन १९१३ मध्ये स्थापन झालेली ही संस्था पुण्यातील गुजराती समाजासाठी कार्यरत असलेली ११३ वर्षांची परंपरा असलेली प्रमुख संस्था आहे.
सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे समाजातील विविध घटकांना जोडण्याचे काम संस्था सातत्याने करत आहे. संस्थेचे सहा हजारांहून अधिक आजीवन सभासद आहेत.
कोंढवा येथील सुमारे चार एकर जागेवर गुजरात भवन, जयराज क्लब व स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे. सुमारे २ लाख ५० हजार चौरस फूट परिसरात विकसित या सांस्कृतिक संकुलात विविध क्रीडा आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन केले जाते.
संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. राजेश शहा यांनी सांगितले की, शहा यांना सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास आहे.















