लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पौड पोलीस ठाण्यात कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व गाडी जप्त न करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ३५ हजार रुपये स्वीकारताना पौड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
सचिन बाळासाहेब शिंदे (वय ४५, रा. ग्रीन फ्लोरेन्सिया सोसायटी, सुसगाव, ता. मुळशी) असे या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत एका ४५ वर्षीय नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या गाडीचा अपघात झाला होता.
त्यानंतर मुळशी येथे दोन गटांत हाणामारी झाली होती. दोन्ही गटांनी परस्परविरोधात गुन्हे दाखल केले होते. तक्रारदार यांच्या विरोधात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे यांच्याकडे होता.
या गुन्ह्यात गाडी जप्त न करण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी सचिन शिंदे यांनी तक्रारदारांकडे १ लाख रुपयांची लाच मागितली. याबाबतची तक्रार १८ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली.
या तक्रारीची पडताळणी शुक्रवारी २० फेब्रुवारी रोजी करण्यात आली. त्यात सचिन शिंदे यांनी तक्रारदारांकडे १ लाख रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर पौड पोलीस ठाण्यात ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे ठरवले.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर येथील पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पौड पोलीस ठाण्याच्या मुळशी बीट कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी सापळा लावण्यात आला.
तक्रारदारांकडून ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सचिन शिंदे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सचिन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे करीत आहेत.
तक्रारदाराच्या मागणीवरून बाहेरचे पथक – पुण्यातील पोलीस अधिकारी कारवाईसाठी आले तर संबंधित पोलीस त्यांना ओळखू शकतात आणि त्यामुळे कारवाई अयशस्वी होण्याची शक्यता आहे, असे तक्रारदारांना वाटत होते. त्यामुळे कारवाईसाठी पुण्याबाहेरील पथक असावे, अशी त्यांनी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर पथकाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. या पथकाने ही संपूर्ण कारवाई यशस्वी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अनेकदा संबंधित जिल्ह्याबाहेरील पथकाकडून कारवाई केली जाते.















