कात्रज-भिलारेवाडीतील घटना : भारती विद्यापीठ पोलिसांकडे घरच्यांनी घेतली धाव
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : नैराश्येतून एका २३ वर्षाच्या तरुणाने हाताची नस कापून घेऊन कात्रज येथील भिलारेवाडी तलावात उडी मारुन आत्महत्या केली.
शंकर बसवराज कलशेट्टी (वय २३) असे या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, शंकर कलशेट्टी याने रविवारी रात्री उशिरा आपल्या घरच्यांना आपण आत्महत्या करीत असल्याचा मेसेज केला. माझ्या जीवनात काही समस्या आहेत. त्या मी सोडवू शकत नाही आणि प्रॉब्लेम घेऊन जगू शकत नाही, असा मेसेज केला होता. त्याचा मेसेज पाहताच घरच्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी मध्यरात्रीपर्यंत त्याचा शोध घेतला. तरी त्याचा शोध लागू शकला नाही. पोलीस भिलारेवाडी येथील तलावाच्या परिसरात त्याचा शोध घेत होते. त्यावेळी पोलिसांना त्याची चप्पल तेथे आढळून आली.
त्यानंतर पोलिसांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तलावात शोध घेऊन शंकर याचा मृतदेह तलावाच्या पाण्यातून बाहेर काढला. तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
