कोंढवा पोलिसांत तरुणाविरुद्ध गुन्हा : तरुणी 9 महिन्याची गर्भवती
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर तरुणाने लग्न न करता फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. एवढेच नाही, तर तरुणाने कोणतीही जबाबदारी न घेता तुला काय करायचे आहे ते कर, मी कोणाला घाबरत नाही, अशी धमकी दिली. फसवणूक करणाऱ्या तरुणावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी शुभम माने (वय 23, रा. कृष्णानगर, महंमदवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका 23 वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी विशाल माने याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखविले. त्यांच्याशी सप्टेंबर 2019 पासून वेळोवेळी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ही तरुणी गर्भवती राहिली. तिने विशाल याला लग्नाविषयी विचारले. पण त्याने लग्नाला नकार देत तुला काय करायचे आहे ते कर, मी कोणाला घाबरत नाही, अशी धमकी दिली. तो लग्न करेल, असे समजून तिने काही महिने वाट पाहिली. आता ही तरुणी 9 महिन्याची गर्भवती झाली तरी त्याने लग्नास संमती न दिल्याने शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेतली आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.
