चंदननगर पोलिसांत फिर्याद : भटक्या कुत्र्याला खायला घालण्यावरून झाले भांडण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शेजारी-शेजारी राहणाऱ्या महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. भांडण सोडविण्यासाठी घरातील इतर लोक पडले. एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली. गळ्यातील चैन गहाळ झाली. हा प्रकार ७ जानेवारी रोजी रात्री पावणेआठ वाजता घडला. चंदननगर पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील ७ जणांवर गुन्हा दाखल केला. भटकी कुत्री घरासमोर येऊन घाण करतात. त्या कुत्र्यांना खाऊ घालणे बंद करा, असे सांगितल्यावरुन दोन कुटुंबांमध्ये मारामारी झाली.
याप्रकरणी दिप्ती राऊत (वय ३५, रा. अनुसया पार्क, खराडी) यांनी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी दिली. त्यावरुन पोलिसांनी श्र्वेता उज्वल थोरात (वय ३७) आणि तृप्ती सूर्यकांत माने (रा. अनुसया पार्क, खराडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या घराजवळ भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी गेल्या. यावेळी श्र्वेता थोरात तेथे आल्या व त्यांनी तू या भटक्या कुत्र्यांना खाऊ घालते, ती कुत्री आमच्या दारात येऊन घाण करतात. तू त्या कुत्र्यांना खाऊ घालणे बंद कर, असे म्हणून तिने हातातील दगड फेकून फिर्यादी यांच्या पाठीवर जोरात मारला. तसेच त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिची बहीण तृप्ती माने हिनेही फिर्यादी यांना मारहाण करुन धमकी दिली.
श्र्वेता थोरात यांच्या फिर्यादीवरून दिप्ती दिलीप राऊत, पुष्पा दिलीप राऊत, दीपक राऊत व दीपक राऊतची पत्नी, संतोष खाटोड अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला. फिर्यादी या त्यांच्या किराणा दुकानात जात असताना त्यांच्या शेजारी राहणारी दिप्ती राऊत हिने तु आमच्या विरोधात पोलीस तक्रार का केली, असे म्हणून शिवीगाळ करुन तिने फिर्यादीची गचांडी पकडून गळ्यातील दोन तोळ्याची चैन ओढून तोडून टाकली. लाकडी काठीने फिर्यादीचे छातीवर, पोटावर, कमरेवर मारहाण करुन दगडाने मारुन हात पाय तोडून टाकेल अशी धमकी दिली. पुष्पा राऊत हिने फिर्यादीचे केस ओढून कपडे फाडले. दीपक राऊत याने फिर्यादीच्या छातीवर बुक्की मारली. संतोष खाटोड याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन दगडाने ठेचून मारु अशी धमकी दिली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक ढवळे अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या
कुत्र्यांवर प्रेम करा पण, दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. एक नव्हे हजार कुत्री पाळा, सांभाळा, पण सार्वजनिक ठिकाणी आणि दुसऱ्याच्या दारात घाण करू नका, एवढा तरी सभ्यपणा पाळला पाहिजे. अन्यथा कुत्र्यांवरील प्रेम बंद करा, असे सांगण्याची वेळ येईल. कुत्र्यांवरील लोकांचे प्रेम वाढत चालले आहे़. मात्र, या कुत्र्यांनी आपल्या घरात घाण करुन नये, म्हणून लोक त्यांना फिरायला घेऊन जातात़ ही कुत्री कोठेही घाण करतात़, त्यातून लोकांमध्ये भांडणे होण्याचे प्रसंग दिवसेंदिवस वाढू लागले आहे़.
