महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दि पूना गुजराती केळवणी मंडळाच्या हरीभाई व्ही. देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जन्मतःच दृष्टिहीन असूनही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा ‘नारी शक्ती – अंतर्दृष्टी विशेष सन्मान’ कार्यक्रमाद्वारे गौरव करण्यात आला.
हा कार्यक्रम ७ मार्च २०२६ रोजी शिकारपूर सोशल फाउंडेशन, रोटरी इंटरनॅशनल क्लब ३१३१ आणि हरीभाई व्ही. देसाई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाच्या डॉ. अर्चना पंडित आणि उपप्राचार्य प्रगती अभ्यंकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा यांनी मंडळाचे आधारस्तंभ असलेले आणि नुकतेच निवर्तलेले आदरणीय स्व. नितीनभाई देसाई यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
दृष्टिहीन नागरिकांसाठी स्व. नितीनभाई देसाई यांनी डोळसपणे केलेल्या सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्याची मोठी जबाबदारी आता आपल्यावर आहे आणि ती आपण सक्षमपणे पार पाडण्याचा निश्चित प्रयत्न करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला कायनेटिक इंजिनिअरिंग ग्रुपच्या संचालिका डॉ. जयश्री अरुण फिरोदिया, माहिती तंत्रज्ञान तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर तसेच निवांत अंधमुक्त विकासालयाच्या संस्थापक-संचालिका मीराताई बडवे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
या प्रसंगी प्रसिद्ध गायिका व शिक्षिका दीपमाला लोहाडे, सामाजिक कार्यकर्त्या सकीना बेदी, उद्योजिका रुक्मिणी राजपूत आणि बीटवाईज कंपनीच्या प्रबंधक दिव्या थोरात या कर्तृत्ववान दृष्टिहीन महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती शहा यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रा. ज्योती मालुसरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी आभार प्रदर्शन करत आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याची संधी महाविद्यालयाला मिळाल्याबद्दल सहआयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता दीपमाला लोहाडे यांच्या सुमधुर गायनाने झाली.















