अतिरिक्त सत्र न्यायाधीशांचा आदेश : वकिलांचा युक्तिवाद केला मान्य
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या जामिनाचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. मरे यांनी जारी केल्याची माहिती ॲड. प्रसाद निकम यांनी दिली.
अनुराग अरुण पाटील (वय-19 रा. फ्लॅट नं. 101 भैरवनाथ अपार्टमेंट शेजारी, आंबेगाव बुद्रुक) असे जामीन मंजूर करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी कोकेन बाळगल्याप्रकरणी आर्यन उर्फ लावण्य राजेंद्र पाटील (वय-20) आणि अनुराग अरुण पाटील (वय-19) यांच्याविरुद्ध एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली होती. आरोपी अनुराग पाटील हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने ॲड. प्रसाद निकम यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने अनुराग पाटील याचा जामिन मंजूर केला. आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी आर्यन उर्फ लावण्य पाटील हा अनुराग पाटील याच्या घरी दोन दिवसांसाठी राहण्याकरिता आला होता. तो पुण्यात शिक्षणासंबंधी माहिती घेण्यासाठी आला होता. पोलिसांना सापडलेला अंमली पदार्थ अनुरागच्या बॅगेत सापडला नसून, लावण्य पाटील याच्या बॅगेत सापडला आहे. त्यामुळे याचा अनुराग पाटील याच्याशी काहीही संबंध नाही. तसेच आरोपीचे वय लहान असून, तो सध्या शिक्षण घेत आहे. त्यामुळे अनुराग पाटील याचा जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद वकिलांनी केला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. मरे यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपीचा जामीन मंजूर केला आहे. आरोपीला प्रत्येक रविवारी सकाळी 10 ते 1 या वेळेत पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. ॲड. प्रसाद निकम यांना कामकाजामध्ये ॲड. तन्मय देव, ॲड. अरुणा अंगरखे आणि ॲड. मन्सूर तांबोळी यांनी मदत केली.
