लष्कर पोलिसांची कामगिरी : एक लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वाहनचोरी करणाऱ्याला लष्कर पोलिसांनी अटक करून चार मोटारसायकल असा एकूण एक लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील शासकीय ७ आणि खासगी १२ सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
सरफाज इकबाल मोमीन (वय २५, रा. आलीफ टॉवरजवळ, कोंढवा, पुणे) असे अटक केलेल्या वाहनचोराचे नाव आहे.
लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना संशयित आरोपी सोलापूर बाजार, कॅम्प येथे हिरोहोंडा स्प्लेंडर घेऊन थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता तीन-चार दिवसापूर्वी कॅम्पमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलीस कोठडीत आरोपीकडे तपास केला असता त्याने तीन दुचाक्या चोरल्याची कबुली दिली. लष्कर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड पुढील तपास करीत आहेत.
पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी, लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक डोंगळे, पोलीस हवालदार कदम, कोळी, मांजरे, तांबोळी, शिरगिरे, भोसले यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.