संजय गाढवे प्रतिष्ठान व शिवसेनेच्या वतीने साहिल कॉम्प्लेक्स येथे गौरव सोहळा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भुम : राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा भूम येथे नागरी सन्मान करण्यात आला.
राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा विकासरत्न संजय गाढवे प्रतिष्ठान आणि भूम शहर शिवसेना पक्षाच्या वतीने नागरी सन्मान सोहळा साहिल कॉम्प्लेक्स येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात शहराच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा संयोगिता गाढवे व विकासरत्न, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी भूम नगर परिषदेचे नगरसेवक, बाजार समितीचे माजी सभापती निलेश शेळवणे, सर्व संचालक, पंचायत समितीचे माजी उपसभापती रामकिसन गव्हाणे, जांब येथील सरपंच समाधान भोरे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित सदस्यांनी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत विकासकामांना प्राधान्य देऊन तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.















