सायबर पोलिसांची कामगिरी : फसवणुकीतील पैसे बँक खात्यात स्वीकारणारे मध्यस्थ अटकेत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची तब्बल २२ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या सायबर चोरट्यांना फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी आपल्या बँक खात्यांचा वापर करू देणाऱ्या चौघांना छत्रपती संभाजीनगर तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरातून अटक करण्यात आली आहे.
मुनीलकुमार सुरेंद्र सिंह (वय ५१, रा. अंबरनाथ, जि. ठाणे), आकाश चंद्रशेखर मराठे, लाला केशव उमाप (वय २६), परमेश्वर दिलीप दाभाडे (वय २३, तिघे रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पुण्यातील ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी फिर्याद दिली होती. हे ज्येष्ठ नागरिक मूळचे हरियाणा येथील असून पुण्यात त्यांची खासगी कंपनी होती. कंपनी विक्रीतून त्यांना मोठी रक्कम मिळाली होती.
ही रक्कम त्यांनी बँकेत ठेवली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले.
त्यानंतर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारातील विविध गुंतवणूक योजनांची माहिती दिली व एक लिंक पाठवली. त्यानंतर त्यांना विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. त्यांनी सायबर चोरटे वापरत असलेल्या सात बँक खात्यांमध्ये वेळोवेळी २२ कोटी तीन लाख रुपये जमा केले; मात्र त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही.
या गुन्ह्याचा तपास करताना मिळालेल्या माहितीच्या तांत्रिक विश्लेषणातून असे दिसून आले की, फसवणुकीतील मोठ्या रकमेचे व्यवहार वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले होते. ही रक्कम २७ वेगवेगळ्या व्यक्तींच्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली होती. त्यापैकी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगिता देवकाते, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल अडसुळे, सुशिल डमरे, पोलीस हवालदार रामाणे, हंबीर, मदने, चौकटे, मांढरे, मुंढे, कोंडे, कारकुड, गंगाधर काळे, पोलीस अंमलदार भिंगारे, होळकर, सचिन शिंदे, विजय भोसले, अमदनान शेख यांनी केली.
मूळ सायबर चोरटे फरारच – परदेशात बसून शेअर मार्केटमध्ये अवास्तव परतावा देण्याचे आमिष सायबर चोरटे दाखवितात. त्यांच्या बोलण्याला बळी पडलेल्यांना भारतातील बँक खातेधारकांच्या खात्यांमध्ये पैसे पाठविण्यास सांगितले जाते. खात्यात जमा होणाऱ्या रकमेपैकी बँक खातेधारकाला सायबर चोरटे पाच टक्के कमिशन देतात. सायबर पोलीस ज्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग होते, त्यांना अटक करतात. पाच टक्के कमिशन मिळाले तरी उर्वरित ९५ टक्के रक्कम सायबर चोरटे घेऊन फरार होतात. पाच टक्के कमिशन घेणारे पकडले गेले की अनेक वर्षे तुरुंगात खितपत पडतात; मात्र मूळ सायबर चोरटे पोलिसांच्या हाती लागत नाहीत.
















