मालकासह ५ जणांवर कारवाई करून १२ हजारांचा माल पोलिसांनी केला जप्त
पुणे : उच्चभ्रू सोसायटीमधील एका इमारतीच्या टेरेसवर चक्क बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहकारनगर पोलिसांनी या हॉटेल मालकासह ५ जणांवर गुन्हा दाखल करून हुक्का फ्लेवरचे १२ हजार ४९५ रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.
हॉटेल मालक राजसिंग भजनसिंग गोरोवाडा (वय ३५, रा. गुरुनानक कृपा बिल्डिंग, तिसरा मजला, राजमुद्रा सोसायटी, धनकवडी), वेटर पारस परमानंद शर्मा (वय २४, मूळ रा. नेपाळगंज, जि. बाके, नेपाळ), सुभाष मानसिंग गिरी (वय २०), तिलक भोला तिवारी (वय ३५), नारायण मेघे आचार्य (वय ३४, सर्व मूळ रा. नेपाळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
हा प्रकार धनकवडी येथील राजमुद्रा सोसायटीतील गुरुनानक कृपा बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवर सुरू होता. सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार ९ फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंग करत गुलाबनगर चौकात आले होते.
पोलीस हवालदार अमोल पवार यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, राजमुद्रा हौसिंग सोसायटीतील मेहेर लिव्हिंग बिल्डिंग शेजारील श्री गुरुनानक कृपा बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्याच्या टेरेसवर हुक्का पार्लर विनापरवाना सुरू आहे. या माहितीची खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी देऊन पथक तयार करून रवाना केले.
पोलीस जिन्याने तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवर गेले. तेथील लाकडी दरवाजा तोडून आत जाऊन छापा टाकला. हॉलमध्ये एकूण ६ टेबल मांडलेले दिसून आले. त्यापैकी ४ टेबलांवर ८ जण हुक्का फ्लेवरचे सेवन करताना आढळले.
या हॉटेलचा राजसिंग गोरोवाडा हा मालक आहे. हॉटेलच्या किचनची पाहणी केली असता तेथे विविध फ्लेवरचे हुक्का भरलेले चिलीम, टेबलावर हुक्का पॉट व इतर साहित्य मिळून आले. पोलिसांनी हा सर्व १२ हजार ४९५ रुपयांचा माल जप्त केला. सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दाम हुसेन फकीर, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, किरण कांबळे, बजरंग पवार, सागर सुतकर, आशिष ढमाळ, निखिल राजीवडे, अभिजित वालगुडे, महेश भगत, आकाश किर्तीकर, खंडू शिंदे, अभिमान बागलाने, अमित पदमाळे, मारोती नलवाड, रफीक तडवी यांनी केली.
आपल्याच इमारतीच्या टेरेसवर बेकायदा व्यवसाय – राजसिंग गोरोवाडा याचे स्वारगेट येथे हॉटेल होते. त्याने हे हॉटेल नुकतेच बंद केले आहे. गुरुनानक कृपा ही संपूर्ण तीन मजली इमारत गोरोवाडा याची खासगी मालकीची आहे. बंद केलेल्या हॉटेलमधील नेपाळी वेटरांना घेऊन त्याने चार दिवसांपूर्वी या इमारतीच्या टेरेसवर विनापरवाना बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरू केले होते. तेथे तो ग्राहकांना हुक्का उपलब्ध करून देत होता. त्यासोबत स्नॅक्स व शीतपेये उपलब्ध केली जात होती. पोलिसांना याची खबर मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली.















