लक्ष्मी रोडवरील घराच्या कामाच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी ब्लॅकमेल करून लुबाडले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लक्ष्मी रोडवरील घराच्या जागेतील झाडांची मुळे ड्रेनेजमध्ये गेली असल्याचे सांगून ते नव्याने बांधावे लागेल, असे कारण देत खर्चासाठी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर त्या कामासोबतच वेगवेगळी कारणे सांगून ज्येष्ठ नागरिकाला गेली दोन वर्षे ब्लॅकमेल करून सायबर चोरट्यांनी तब्बल ६ कोटी ७० लाख ३७ हजार ५०० रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत नारायण पेठेत राहणाऱ्या ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी संदिप चव्हाण, आदित्य चव्हाण, जितेन सोळंकी शर्मा, राऊत तसेच बँक मॅनेजर आणि न्यायाधीश असल्याचे सांगणारा महाजन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २८ एप्रिल २०२४ पासून सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईच्या नावावर लक्ष्मी रोडवरील एका सोसायटीत जागा आहे. त्यांना एके दिवशी या जागेबाबत फोन आला. संबंधित व्यक्तीने सोसायटीने ड्रेनेजचे काम करण्यास सांगितले असून तुमच्या जागेतील ड्रेनेजमध्ये झाडाची मुळे गेली आहेत, त्यामुळे ते नव्याने बांधावे लागेल, असे सांगितले. त्यासाठी वैयक्तिक खर्च, साहित्याचा खर्च, कामासाठी लागणाऱ्या मशीनचा डिपॉझिट आदी कारणे सांगून त्यांच्याकडून ऑनलाइन पैसे घेतले.
तसेच या कामासाठी पुणे महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागेल, त्याचे चलन, ट्रान्सफर चार्जेस, सर्व्हिस चार्जेस, बँक खात्यात बॅलन्स मेंटेन करणे आदी कारणे देत संदिप चव्हाण व आदित्य चव्हाण यांनी त्यांच्याकडून पैसे उकळले. फिर्यादी पैसे देत असल्याचे पाहून संदिप चव्हाण यांच्या मुलाच्या ऑपरेशनच्या नावाखालीही वारंवार पैसे घेतले. त्यानंतर त्यांचा मुलगा वारल्याचे, तसेच राऊतचा मुलगा वारल्याचे सांगण्यात आले.
एकदा ‘न्यायाधीश बोलत आहेत’ असे सांगून त्यांच्या नावाने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करण्यात आली. आदित्यच्या मुलाचे ऑपरेशन, त्या न्यायाधीशांच्या पत्नीचे निधन आदी कारणे देत त्यांना धमकावून पैसे देण्यास भाग पाडले. अशा प्रकारे सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडून तब्बल ६ कोटी ७० लाख ३७ हजार ५०० रुपये उकळले.
फिर्यादी यांनी लक्ष्मी रोडवरील सोसायटीत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता घराजवळील ड्रेनेजचे कोणतेही काम झालेले नसल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील तपास करत आहेत.
















