शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजीत डुंगरवाल
पुणे: जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीस २४ तासात जेरबंद करण्यास शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे.
पियुष मरोठे, (वय-२२, रा. वानवडी गांव) प्रणय लोंढे, (वय-१८, रा. तानाजीनगर चिंचवड व वानवडी), व दोन विधीसंघर्षीत बालके ताब्यात घेण्यात आली. त्यांच्याकडुन चोरी केलेला मोबाईल फोन, सोन्याची चेन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटर सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच त्यांच्या ज्या खात्यामध्ये पैसे जमा झाले ते खाते गोठवण्यात आले आहे. त्यांच्याकडुन एकुण १,९०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.फिर्यादी टॅक्सी कॅब ड्रायव्हर हे त्यांच्याकडील प्रवासी घेऊन जात असताना चार अनोळखी व्यक्तींनी त्यांची गाडी अडवून फिर्यादीस मारहाण केली. जबरदस्तीने त्यांच्याकडील मोबाईल फोनवरून ऑनलाईन ट्रान्झेक्शन करून, त्यांच्याकडील मोबाईल व सोन्याची चेन जबरी चोरी करून नेली. याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने केलेल्या ट्रान्झेक्शनवरुन तसेच तांत्रिक पुराव्याच्या सहाय्याने मागोवा घेण्यात आला.
त्यावरून हे संशयीत आरोपी हे दादर, मुंबईला असल्याचे समजले. त्यानुसार तपास पथकाचे अजित बडे यांच्यासह तपास पथकाला तात्काळ मुंबई येथे रवाना करण्यात आले. संशयीत आरोपी हे मुंबई मध्ये सतत जागा बदलत असल्याचे दिसुन येत होते. त्यांचा सातत्याने पाठलाग करून चारही आरोपींना सांताक्रुझ रेल्वे स्टेशन परिसरातुन मुंबई मधून मध्य प्रदेश येथे जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०१ संदिपसिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग वसंत कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, बाजीराव नाईक, सहायक पोलिस फौजदार अविनाश भिवरे, पोलीस अंमलदार, राजकिरण पवार, मिलींद काळे, गणपत वालकोळी, सतिश कुंभार, प्रविण घडस, गणेश जाधवर, अर्जुन कुडाळकर, तुकाराम म्हस्के यांनी केली आहे.
