महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कै. श्री. हिरालालजी नारायणदास दुगड यांच्या स्मरणार्थ दुगड ग्रुपच्या वतीने रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी 8.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत बिबवेवाडी येथील पुष्पा हाइट्स, पुणे येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचे हे सातवे वर्ष असून दरवर्षी मोठ्या उत्साहात नागरिकांचा सहभाग लाभत आहे.
“करूया रक्तदान, देऊया जीवनदान” या प्रेरणादायी संकल्पनेतून हे शिबिर राबविण्यात येत असून समाजातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमामागील मुख्य उद्देश सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा उपलब्ध करून देणे हा आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या कालावधीत रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या शिबिरामध्ये सुमारे सहा ब्लड बँकांच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रिया वैद्यकीय निकषांनुसार व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार आहे. पुणे हॉस्पिटल ब्लड बँक सेंटर, भारती हॉस्पिटल ब्लड सेंटर, महाब्लड सेंटर कॅम्प पुणे, आधार ब्लड सेंटर, आचार्य आनंद ऋषीजी ब्लड सेंटर आणि पीएसआय ब्लड सेंटर (सह्याद्री, पुणे) या ब्लड सेंटर्सच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिरात दरवर्षी सुमारे ४०० ते ५०० बाटल्यांनी रक्तसंकलनात वाढ होत असून आतापर्यंत झालेल्या शिबिरांमध्ये सुमारे ५००० रक्तदात्यांनी रक्तदान करून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला आहे.
यंदाच्या वर्षी ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत हिमोग्लोबिन टेस्ट, रँडम ब्लड शुगर तपासणी, बीएमआय तपासणी, बोन डेंसिटी टेस्ट, डेंटल चेकअप तसेच स्तन व गर्भाशय मुख कॅन्सर स्क्रीनिंगसह विविध आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत.
महिला दिनानिमित्त जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) लेडीज विंगच्या वतीने विशेष कार रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीची सांगता पुष्पा हाइट्स येथे होणार आहे. या कार रॅलीमधील सहभागी महिलाही मोठ्या संख्येने रक्तदान व महिला आरोग्य शिबिरात सहभागी होणार असल्याची माहिती लेडीज विंगच्या अध्यक्षा एकता भन्साळी यांनी दिली. या उपक्रमासाठी डॉ. विजय सेठिया (सिद्धार्थ हॉस्पिटल) यांचे विशेष सहकार्य लाभत असून दुगड परिवारातील सर्व सदस्यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहणार आहे.
तसेच या सामाजिक उपक्रमासाठी गौतमनिधी फाउंडेशन, युगल धर्म संघ, जैन सोशल ग्रुप, सहायता ग्रुप, एफटीएन फाउंडेशन, आनंद दर्शन युवा मंच, फिलांटस कम्युनिटी सर्व्हिसेस, दि सोशल युथ क्लब, आरजी हेल्पिंग हॅण्ड, आय सोशल क्लब, रोटरॅक्ट रोटरी क्लब, आरंभ यात्रा संघ, गुड टाईम्स क्लब, डिव्हाईन जैन ग्रुप ट्रस्ट, एलिमेंट्स ग्रुप, दि होते सम, बाउल फ्रेंड्स क्लब, गोविंदा ग्रूप, पंच परमेष्ठी प्रतिष्ठान, श्रीमंत सुवर्णवीर तरुण मित्र मंडळ (ट्रस्ट), कुमुद ग्रुप, उडान टीम पुणे, निओमेड कॅन्सर केअर, डायग्नोपेन डायग्नोस्टिक, फर्स्ट व्हिजन आणि लव्ह केअर शेअर फाउंडेशन आदी सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभणार आहे.
इच्छुक रक्तदात्यांनी नावनोंदणीसाठी किर्तिराज दुगड (मो. ९८२२०३४३४४), ऋषभ दुगड (मो. ९८५०१९९९२७) व गीता बोथरा (मो. ९५४५७००७०७) यांच्याशी संपर्क साधावा.
“रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ आणि जीवनदायी दान मानले जाते. अनेक वेळा अपघात, शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारांमुळे रुग्णांना तातडीने रक्ताची गरज भासते. अशा वेळी रक्तदात्यांचे योगदान अनेक कुटुंबांना नवे जीवन देणारे ठरते. त्यामुळे समाजातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मोठ्या संख्येने पुढे यावे आणि या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे. आपल्या एका रक्तदानामुळे एखाद्याचे जीवन वाचू शकते, ही जाणीव ठेवून सर्वांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.” – ॲड. रवींद्र दुगड, दुगड ग्रूप















