गुन्हे शाखेची कारवाई : सात लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सदनिकेस लॅच लॉक लावून लग्न समारंभास गेल्यानंतर घरफोडी करून सोने चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा 5 लाख 18 हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तरप्रदेशमधील टोळीतील चौघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
साकिब शौकतअली अन्सारी (वय 23), दानिश वारीस शेख (वय 22), सलमान ऐहसान अलवी (वय 26), आणि वसिम शौकतअली अन्सारी (वय 24, चौघेही रा. नागपूर चाळ, मुळ उत्तर प्रदेश) असे कोठडी सुनावलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांच्याविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी विनय विठ्ठल ताम्हाणे (वय 28, रा. बाणेर) यानी फिर्याद दिली आहे. बाणेर येथील भक्ती अॅम्बियन्स लेन. क्र. ८ येथे २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेतीन या कालावधीत हा प्रकार घडला होता.
आरोपी हे मुळचे उत्तरप्रदेश राज्यातील असून विविध शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कुटुंबासाठी म्हणून भाडेतत्वावर खोली घेवून काही कलावधीसाठी वास्तव्य करायचे तसेच, त्या ठिकाणी रिक्षा चालवायला घेत परिसरात फिरून जवळच्या अपार्टमेंटमध्ये जावून रेकी करीत तसेच दिवसा घरफोडी करीत असल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

















