महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : स्त्रीला सन्मान आणि अधिकार मिळायला हवा असे मनोगत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ६ मार्च रोजी राज्यस्तरीय कारागृह महिला अधिकारी, कर्मचारी परिषद उदघाटन आणि महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी सन २०२२ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य चे अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग स्वाती साठे, तसेच सांख्यिकी अधिकारी श्रीकांत जावरकर हे उपस्थित होते. हे प्रकाशन कारागृह कर्मचारी भवन, दौलतराव जाधव तुरूंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, येथे झाले.
या परिषदेत विविध व्याख्यात्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांचे आरोग्य या विषयावर डॉ. शिल्पा थोरात आणि योगाचार्या रचना महाजन, महिलांबाबत कायदेविषयक माहिती याविषयावर लॉ कॉलेज प्राचार्या डॉ. दिपा पातुरकर, महिलांचा अर्थव्यवस्थेतील सहभाग या विषयी सी. ए. शलाका जोशी व आर्थिक सल्लागार आरती डीके आणि खाद्यसंस्कृती विषयी जुगनु गुप्ता यांनी व्याख्यान दिले.
या परिषदेत डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी महिला अधिकारी व कर्मचारी यांना संबोधित करताना कारागृह विभागात सेवा करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला. आजच्या परिस्थितीमध्ये कारागृह विभागात महिलांची परिषद होणे ही मोठी बाब असल्याचे सांगून त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.
स्त्री अधिकार, समाजातील त्यांची व्याप्ती, स्थान व स्रियांवर असलेल्या जबाबदाऱ्या, त्याग या सर्व मुद्यांवर माहिती देत राज्यभरातील महिला अधिकारी व कर्मचारी यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. यावेळी कारागृहाचे प्रमुख अमिताभ गुप्ता यांनीदेखील महिला अधिकारी व कर्मचारी यांनी आपापली जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडावी असे सांगून महिला कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले.
“महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी सन 2022” या प्रकाशनाचा उपयोग बंदींचे सुधारणा व पुनर्वसन करण्यासाठी शासनास धोरणात्मक निर्णय घेण्याकरीता तसेच संशोधन व अभ्यास करणाऱ्या सर्वांना उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन केले. ७ मार्च रोजी देखील विविध व्याख्याने व मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
