राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षातर्फे घोषणा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
शिरूर: नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती निलेश मोहनलाल खाबिया यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
मुंबई येथे आमदार ॲड.अशोक पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खाबिया यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हा खाबिया यांची युवक शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर २००७ ते २०१३ पर्यंत त्यांनी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रसिध्दी प्रमुख व सरचिटणीस म्हणून काम केले.
पुढे त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतरही खाबिया यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. ते पवार यांच्याशी कायम एकनिष्ठ राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश संघटक सचिव पदाची जबाबदारी खाबिया यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
पत्रकारिता क्षेत्रातही खाबिया यांचे योगदान असून त्यांनी विविध दैनिकात वार्ताहर म्हणून काम केले आहे. त्यांनी पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. खाबिया यांचे वडील कै. मोहनलाल खाबिया हे देखील शरद पवार समर्थक होते.
पवार यांच्या पुलोद, समाजवादी काँग्रेस, काँग्रेस (आय) या राजकीय प्रवासात खाबिया यांनी शिरूर शहराचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्याच्यानंतर त्याचे चिरंजीव निलेश यांनी पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. ते आजतागायत पवार यांच्या सोबत आहे.
खाबिया यांच्या एकनिष्ठतेची जाणीव ठेऊन आमदार पवार यांच्या शिफारशीवरून पवार यांनी त्यांना राज्यावर काम करण्याची संधी दिली. खाबिया यांनी पुणे येथे शरद पवार यांची भेट घेतली. संधी मिळाली आता कामातून त्याचे सोने करण्याचा प्रयत्न करा अशा शुभेच्छा पवार यांनी यावेळी दिल्या.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुरोगामी विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यास कटिबध्द असल्याचे खाबिया यांनी सांगितले.
