महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : खेळाचा आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे. ते एकमेकांना पूरक आहेत. खेळण्यासाठी आरोग्य चांगले, तंदुरूस्त लागते. त्यामुळे खेळाडूला अधिक बळ मिळते. खेळाडू हे मैदानावर असोत की मैदानाबाहेर सर्वसामान्य जीवनात असोत, खेळ खेळणारे असोत की निवृत्त झालेले असोत ते नेहमीच उर्जावान, उत्साही दिसतात. खेळ ही तंदुरूस्त आरोग्याची संजीवनी असल्याने पालकांनी पदकांसाठी नव्हे तर शाररीक तंदुरूस्तीसाठी आपल्या मुलांना कोणत्याही खेळासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांनी आज येथे केले.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बावधन येथील बन्सीरत्न ऑडिटोरियममध्ये, क्रीडा राज्ञी जीवन गौरव पुरस्कार देऊन नीता तळवलिकर यांचा आणि क्रीडा राज्ञी पुरस्काराने पुण्यातील 17 खेळाडंचा गौरव राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
समारंभाच्या अध्यक्षपदावरून जाधव बोलत होते. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्सिट्यूटस आणि संवाद पुणे यांनी “गौरव तिच्या उत्तुंग कर्तृत्वाचा” या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले होते. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूटस चे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी चोरडिया, सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष आणि अध्यक्ष स्वेला सुषमा चोरडिया, सहाय्यक उपाध्यक्ष स्नेहल नवलाखा, क्रीडा राज्ञी जीवन गौरव पुरस्काराच्या माजी विजेत्या हॉकीच्या माजी कर्णधार रेखा भिडे – मुंडफन आणि ऍथलेटिक्सच्या प्रशिक्षक गुरबन्स कौर, हिल रेंज हायस्कूलच्या अध्यक्ष डॉ. तेजस्वीनी भिलारे, महाराष्ट्र आर्थिक महामंडळ मुंबईचे अध्यक्ष सचिन ईटकर, निकीता मोघे आणि संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन व्यासपीठावर उपस्थित होते.
या समारंभात श्रृती कोतवाल (रनिंग), स्नेहल शिंदे (कबड्डी), अकुताई उलभगत (पॅरा ऍथलेटिक्स), ऐश्वर्या घोडके (स़ॉफ्टबॉल), ऋतूजा भोसले (टेनिस), कोमल गोळे (कुस्ती), राधिका दराडे (सायकलिंग), समिक्षा शेलार (ज्युदो), खुशी मुल्ला (क्रिकेट), भावना सत्यगिरी (आर्चरी), प्रियांका इंगळे (खो खो), मिताली प्रधान (मल्लखांब), वैशाली सुळ (हॉकी), श्रेया कंदारे (योगा), हिमाली कांबळे (वेटलिफ्टिंग), रेणुका साळवे (ज्युदो दिव्यांग), नेहा बढे (रोईंग) यांना क्रीडा राज्ञी पुरस्काराने गौरविण्यात आले.
शांताराम जाधव म्हणाले, माझा खेळ कबड्डी, त्यासाठी कोणतेच साधन लागत नाही. शरीर हेच या खेळाचे महत्वाचे साधन असल्याने सहाजिकच आम्हाला शाररीक तंदुरूस्ती बरोबरच सुदृढ शरीरयष्टी लागते. त्यामुळे मी आजही व्यायाम करतो. ज्याला खेळायची आवड आहे त्याला अपोआप तंदुरूस्तीचे महत्व समजते.
आज या पुरस्कार विजेत्या महिला खेळाडू किंवा निवृत्त झालेल्या खेळाडंकडे बघा, सर्वजणी उत्साही दिसत आहेत कारण त्यांना पुरस्कार मिळतोय म्हणून नाही तर चांगले खेळण्यासाठी त्यां शाररिक तंदुरूस्तीचे भान ठेवत असल्याने त्या तजेलदार दिसतात. आज सर्व क्षेत्रात महिला पुरूषांपोक्षा थोडे जास्त चांगले काम करतात असा आपला अनुभव आहे.
खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, खेळांबाबत श्री मोदीजींचे सरकार जास्त गंभीर आहे. त्यामुळेच खेळ किंवा कलाकौशल्य ही आदर करिक्युलर ऍक्टिव्हिटी न रहाता त्याला क्रेडिट पॉईटस देण्याचे धोरण नव्या शैक्षणिक धोरणात स्वीकारले आहे.
त्यामुळे आता पालकांनी आपल्या मुलांना बंधनमुक्त करून त्यांच्यातील कलाकौशल्य किंवा खेळांसाठी आकाश मोकळे द्यावो असे आवाहन त्यांनी केले.खेळाडूंच्यावतीने भावना व्यक्त करताना नीता तळवलिकर म्हणाल्या, पूर्वीच्या तुलनेत आता जास्त सोयी सुविधा खेळाडूंना मिळू लागल्या आहेत. खेलो इंडिया स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना नोकरीत आरक्षण ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
याचा जास्तीत जास्त लाभ आपल्या मुलांनी घ्यावा यासाठी पालकांनी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यावेळी डॉ. तेजस्वीनी भिलारे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूर्यदत्तचे संस्थापक व अध्यक्ष प्रा डॉ संजय बी चोरडिया म्हणाले, आमचे अनेक कार्यक्रम उपक्रम हे संवादातून ठरतात. त्यातलाच हा महिला खेळाडूंच्या गौरवाचा कार्यक्रम आहे. महिलांच्यात मल्टी टास्कींगची क्षमता ही पुरूषांपेक्षा जास्त असते.
त्यामुळे त्यांच्या क्षमतेचा गौरव करण्यासाठी हा क्रीडा राज्ञी पुरस्कार सोहळा आहे. आपली सर्व कामे संभाळून खेळात प्राविण्य मिळवण्याचे अधिकचे प्रयत्न करणाऱ्या नारी शक्तीच्या प्रयत्नांना सलाम आहे. सूर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार असो वा नारी शक्ती पुरस्कार या माध्यमातून स्त्रियांचा योग्य सन्मान व त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याचे काम सूर्यदत्त गेली अनेक वर्ष करत आहे. प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी सांगितले की संवाद पुणे ही सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे.
संस्कृती म्हणजे फक्त कला नव्हेत तर क्रिडा म्हणजे खेळ हे आपल्या सांस्कृतिचाच एक भाग असल्याचे दाखले जुन्या ग्रंथात मिळतात. त्यामुळे आम्ही महिला दिनी क्रीडापटूंचा पुरस्कार देऊन गौरव करण्याचे ठरवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस चे संचालक प्रशांत पितलिया यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन ईटकर यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते .
