पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांचा इशारा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : आठ दिवसात परप्रांतीयांची नोंद करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी दिला आहे.
भूम शहरात मोठ्या संख्येने परप्रांतीय वास्तव्य करत आहेत. पर प्रांतातून येणाऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात पवनचक्क्यांची कामे, बांधकाम मुजूर, शेती कामात मजुर आणले जात आहेत. यासाठी भूम शहरात काही परप्रांतीय ठेकेदार कार्यरत झाले असून यांच्यामार्फतच युपी बिहार मधून मजूर भूम शहरात आणून कामांसाठी पुरवले जात आहेत.
हे परप्रांतीय मुजूर ज्या घरमालकाच्या ठिकाणी राहतात त्या घरमालकांनी या संदर्भात भूम पोलीस स्टेशनला माहिती देणे बंधनकारक आहे तरी घरमालक याबाबतीत कुठलीही माहिती पोलीस स्टेशनला देत नाहीत. त्यामुळे शहरात रात्री हे परप्रांतीय मोठ्या संख्येने फिरताना दिसत आहेत.
या परप्रांतीयाकडून एखादा गुन्हा झाल्यास त्या परप्रांतीला शोधण्याचं जिकरीचं काम पोलीस प्रशासनाला होऊ शकते. त्यामुळे भूम शहरात असणारे परप्रांतीय यांचे आधार कार्ड तसेच त्यांचा पत्ता व त्यांना या ठिकाणी कोणाच्या मध्यस्थीने आणले गेले त्याचे नाव याच्या नोंदी असणे गरजेचे आहे याबाबतीत आज उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भूम पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेले आहे.
सर्व परप्रांतीय व घरमालकांना तसेच त्यांना कामासाठी बोलवणाऱ्या ठेकेदारांना आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे आठ दिवसाच्या आत सर्वप्रथम यांना भूम पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांचे आधार कार्ड व फोटो जमा करावा अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना देण्यात येणार आहेत असे सूर्यवंशी यांनी सांगितले.
या निवेदनावर युवा नेते आबासाहेब मस्कर, चंद्रमणी गायकवाड, संतोष सुपेकर यांच्या सह्या आहेत.
