महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : मित्रांसह पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या जगदंबा हॉटेलमध्ये मित्रांसह जेवायला आलेल्या तरुणावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
अविनाश बाळू धनवे (वय ३४, रा. आळंदी) असे खून झालेल्याचे नाव आहे. इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश आणि त्याचे तीन ते चार मित्र मोटारीमधून हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवत असतानाच त्याठिकाणी आणखी एक चारचाकी गाडी आली.
त्यामधून उतरलेल्या पाच ते सहा जणांनी हॉटेलमध्ये घुसून हल्ला चढवला. एकाने पिस्तूलातून अविनाशवर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी त्याच्या डोक्याच्या उजव्या बाजूला तर दुसरी उजव्या पायाच्या जांघेत घुसली. जागेवरच खाली कोसळलेल्या अविनाशवर कोयत्याने वार करण्यात आले.
त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. धनवे याचे मित्र हा थरार पाहून घाबरून पळाले. पोलिसानी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, बाह्यवळण रस्त्यावर नाकेबंदी केली. धनवे व त्याचे मित्र देखील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.
