महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात कुख्यात गुंड नाना गायकवाड याच्यासह पत्नी व मुलावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मोक्का कारवाईचे आदेश अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील यांनी दिले आहेत. नानासाहेब उर्फ भाऊ शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड (वय-68), मुलगा गणेश नानासाहेब गायकवाड (वय-39 तिघे रा. एनएसजी हाऊस, बाणेर रोड, औंध) यांच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आरोपी नानासाहेब गायकवाड याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली. त्याने बेकायदेशीर मार्गाने गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळवण्यासाठी संघटित गुन्हेगारी केली आहे. या टोळीने हिंसाचाराचा वापर करुन किंवा हिंसाचार करण्याची धमकी देऊन किंवा धाकदपटशा दाखवुन, जुलूम जबरदस्ती करुन किंवा अवैध मार्गाने आपले बेकायदेशीर कृत्य चालू ठेवले.
या टोळीने मागील १० वर्षात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे, एखाद्या व्यक्तीस मृत्यु किंवा जबर दुखापत करण्याची धमकी देणे, फौजदारीपात्र कट करणे, अनैसर्गिक संभोग करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगून दहशत निर्माण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे गुन्हे केले आहेत.
तसेच या टोळीविरुद्ध मागील १० वर्षाच्या कालावधीत एकापेक्षा जास्त दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ -४ विजयकुमार मगर यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील यांना सादर केला होता. कागदपत्रांची पडताळणी करुन त्यांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग आरती बनसोडे करीत आहेत.
