मॅनेजिंग ट्रस्टीपदी राजेश शहा यांची फेरनिवड
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या कार्यकारिणीची सन २०२४ – २०२९ या पाच वर्षांसाठी निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी नितीन देसाई यांची चौथ्यांदा एकमताने निवड झाली.
२०११ पासून नितीन देसाई हे या संस्थेचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. उपाध्यक्षपदी वल्लभभाई पटेल यांची प्रथमच निवड झाली. तर मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून जयराज ग्रुपचे संचालक राजेश शहा यांची सलग दुसऱ्यांदा सर्वानुमते निवड झाली. जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून नैनेश नंदू यांची निवड करण्यात आली. सचिवपदी राजेंद्र शहा यांची तर खजिनदार म्हणून हरेश शहा यांची निवड झाली.
एकूण २१ ट्रस्टींमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, तीन महिला प्रतिनिधी व १६ ट्रस्टी अशी संपूर्ण कार्यकारिणी निवडण्यात आली. नितीन देसाई हे पुण्यातील नामांकित एच व्ही देसाई आय हॉस्पिटल तसेच दि पूना गुजराती केळवणी मंडळ या संस्थांचे अध्यक्ष आहेत.
राजेश शहा हे दि पूना गुजराती केळवणी मंडळ या नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचे चेअरमेन व एच व्ही देसाई आय हॉस्पिटलचे चेअरमेन असून पूना हॉस्पिटल, जनसेवा फॉऊंडेशन, विवेकानंद इन्स्टिटयूट इत्यादी अनेक संस्थांच्या विविध पदांवर कार्यरत आहेत.
श्री पूना गुजराती बंधू समाज ही सन १९१३ सालापासून पुण्यातील ११० वर्षांची परंपरा असलेली गुजराती समाजासाठी काम करणारी संस्था आहे. ही संस्था एक एक शतकाहून अधिक काळापासून पुण्यातील गुजराती समाजातील लोकांसाठी सामाजिक, शैक्षणिक, व्यवसाय, आरोग्य अशा विविध विषयांबाबत कार्यरत आहे.
या संस्थेचे सहा हजार पेक्षा जास्त आजीवन सभासद आहेत. या संस्थेचे कोंढवा येथे सहा एकर जागेमध्ये गुजरात भवन व जयराज स्पोर्ट्स & कन्व्हेन्शन सेंटर ही नवीन सांस्कृतिक भवन सुमारे २,५०,००० चौरस फूट जागेवर उभारण्यात येत आहे. या ठिकाणी विविध खेळ व राष्ट्रीय स्तरीय स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत त्याचे उदघाटन करण्याचे नियोजन असल्याचे राजेश शहा यांनी सांगितले.