महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : सदाशिव धर्मराज अनभुले यांच्या खुन खटल्यामध्ये आरोपी राजाभाऊ उर्फ रमेश नवनाथ कोकाटे, नवनाथ भगवान कोकाटे, उमेश नवनाथ कोकाटे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मौजे निपाणी ता. भूम येथे ही घटना घडली आहे.
२०१५ साली फिर्यादी सदाशिव धर्मराज अनभुले हे शेतात येत असतांना मारुती मंदिरासमोरील भुजंग कोकाटे यांच्या घराजवळ गावातील मधल्या रस्त्यावर रमेश नवनाथ कोकाटे व नवनार्थं कोकाटे यांनी त्यांना धरले, कटावणीने कपाळावर मारले सळईने मारले अशी तक्रार दिली होती.
राजाभाऊ उर्फ रमेश नवनाथ कोकाटे, नवनाथ भगवान कोकाटे, उमेश नवनाथ कोकाटे यांचेविरुध्द गुन्हा दाखल झाला. त्यानंतर फिर्यादी सदाशिव धर्मराज अनभुले यांचे निधन झाले. सदर गुन्हयात कलम ३०२ दाखल केले होते. ते प्रकरण भूम येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश विश्वास एस. माने यांचेसमोर प्रकरणाचा साक्षीपुरावा होवून सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदारांच्या जबानी नोंदवल्या गेल्या.
परंतू आरोपीने गुन्हा केल्याबाबत सबळ पुरावा आलेला नसल्यामुळे तसेच आरोपीचे वकिल अॅड. एस. एम. शहा, अॅड. पंडित व्ही. ढगे यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायमुर्ती विश्वास एस. माने यांनी आरोपी राजाभाऊ उर्फ रमेश नवनाथ कोकाटे, नवनाथ भगवान कोकाटे, उमेश नवनाथ कोकाटे यांची निर्दोष मुक्तता केली.
आरोपीचे वतीने अॅड.एस.एम. शहा, अॅड. पंडित व्ही. ढगे व अॅड. एस.टी. झालटे यांनी काम पाहिले व त्यांना अॅड. दत्तात्रय बी. चिकने यांनी सहकार्य केले.
